वाचनीय कथांचा नजराणा म्हणजेच कोवळे कोंब
परीक्षण :- बालसाहित्यिक बबन शिंदे, कळमनुरी
बालसाहित्य निर्मिती ही एक महादिव्य काम आहे, कारण बालकातला बालक हे ज्याला होता येतं, मुलांत मुलं म्हणून ज्याला वावरता येतं ; तोच व्यक्ती वालसाहित्य निर्माण करू शकतो. बालवाड्मय निर्मिती ही एक अवघड गोष्ट आहे, ते प्रत्येकाला जमेलच असे नाही, प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट जमावी असेही काही नाही, प्रत्येक साहित्यिक आपल्या प्रतिभा शक्तीच्या व अनुभवाच्या बळावर साहित्य निर्मिती करत असतो. आपले शब्द, आपली भाषा, अनुभव, निरीक्षण, परंपरा, अनुकरण, प्रभाव, धाडस, कारुण्य, दुःख अशा विविध छटा आणि या सगळ्यांच्या सारातून कलात्मक कथा जन्मते ; तीच कथा वाचकांना आवडते नव्हे वाचकांची जीव की प्राण बनते. ‘कोवळे कोंब’ हे अशाच कथांचा संग्रह आहे, संजय द. गोराडे या बालसाहित्यकाराने अतिशय सुंदर अशा कथांचा नजराणा बालकुमारांना वाचायला उपलब्ध करून दिला आहे.
संजय गोराडे यांच्या ‘कोवळे कोब’ या कुमार कथासंग्रहाची सुरुवातच एकदम दमदार अशा काल्पनिक कथेने झाली आहे, कथा काल्पनिक असली तरी ती सत्यात उतरवण्यासाठी वा वास्तवात उतरण्यासाठी काय करावे लागेल याचे उत्तरही कथाकाराने कथेच्या माध्यमातून दिले आहे. ‘जादुई छडी’ असे कथेचे नाव असले तरी त्यात जादुगार नाही, कथा आकाशातल्या परीसंबंधित आहे, परी दिसायला अत्यंत सुंदर असते. तिला आकाशात मनमुराद उडता येते, तसेच रोहितलाही वाटते ; आपल्यालाही तिच्यासारखे उडता येण्यासाठी आपण काय केले पाहिजे हे तो परीला विचारतो, तेव्हा परी त्याला प्रेमात सांगते की, तुला माझ्यासारखे आकाशात उडायचे असेल तर तू खूप अभ्यास करून पायलट बन. येथे कथाकार संजय गोराडे यांनी कुमार वाचकांना केवळ कल्पनेच्या भराऱ्या न घेता विज्ञानाचा अभ्यास करून सर्व बाबी साक्षात उतरता येतात हे कथेच्या माध्यमातून अगदी सहज स्पष्ट करून सांगितले आहे. त्यांनी मुलांना विज्ञानावादी बनण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे.
याच कुमार कथासंग्रहात ‘माणूस’ नावाची अप्रतिम कथा आहे, कथेच्या माध्यमातून कथाकाराने मोठ्यांच्या कुचेष्टेने बोलण्याचा बालकाच्या मनावर कसा परिणाम होतो हे अतिशय उत्तम रीतीने समजावून दिले आहे, येथे तेजसचा भाऊ विजय त्याला सहजच काय अजगरासारखा पडून राहतोस असे म्हणताच तेजसचा चेहरा पडतो, तो नाराज होतो, बालकांना दिलेल्या नसत्या उपमा आवडत नसतात, दुसरी बाजू म्हणजे त्या त्या प्राण्यांचे वैशिष्ट्य बालकुमार वाचकांच्या सहज लक्षात आणून दिले आहेत, या कथेत अजगर, हत्ती, मुंगी, मांजर, गाढव आणि वाघ या प्राण्यांच्या नावाने तेजसला वेगवेगळ्या व्यक्तींनी संबोधले आहे, पण ते तेजसला म्हणजे बालकुमारांना आवडत नाही, रोज त्याचे वडील त्याला लाडाने वाघ म्हणत असत, पण असे काय घडते ज्यामुळे सहज वाघ म्हटलेले सुद्धा तेजसला आवडत नाही, खरंतर वाघ हा प्राणी पराक्रमाचे, चपळाईचे प्रतिक आहे, पण जेव्हा बालकुमार रागात असतात, तेव्हा त्यांना चांगले वाईट कोणतेच नाव दिलेले आवडत नाही. कथाकार संजय गोराडे हे कामगार असले तरी त्यांना बालकांच्या मनाची, आवडी निवडीची उत्तम जाण असल्याचे दिसून येते, म्हणूनच ते बालकुमारांसाठी व किशोरवयीन मुलांसाठी इतक्या छान छान कथा लिहू शकले आहेत हे मान्य करावे लागेल. कथेत तेजसला विजयचे चिडवणे, सरांनी गाढव म्हणणे, मुलांनी मुंगीभाई हत्तीभाई म्हणणे हे सगळे प्रसंग कथाकाराने छान रेखाटले व फुलवले आहेत.
‘गर्विष्ठ हौशा’ ही एक छानशी कथा आहे, या कथेच्या माध्यमातून कथाकाराने गर्विष्ठ स्वभावाच्या व्यक्तीला चांगलीच समज दिली आहे. कुमार, किशोरवयीन मुलं कामाच्या कंटाळा करतात, त्यांना खायला प्यायला चांगले हवे असते, मात्र कष्ट नको असतात, येथे कथाकाराने प्रतीकात्मक गाय आणि गायीचे वासरू दाखवलेले आहेत. ते वासरू दिसायला खूप सुंदर असते, त्याचा थाट काही औरच असतो, तो इतरांना तुच्छ लेखतो, काम न करणे, गर्विष्टासारखे वागणे हे त्याचे अवगुण कालांतराने त्याच्याच अंगलट येतात. त्याचा स्वतःचा स्वभाव त्याला स्वतःसाठीच घातक ठरतो, इतरांनी त्याला समजावून सांगितले तरी त्याला समजत नाही, परिणामी तो त्याच्या आळशी आणि गर्विष्ठपणामुळे सर्वांच्याच नजरेतून तो उतरतो. त्याच्या दुर्व्यवहारामुळे मालकाचे दुर्लक्ष होते, तो लाडका असूनही त्याच्या खाण्यापिण्याकडे कोणीच लक्ष पुरवत नाही. जेव्हा त्याला हे कळून चुकते ; तेव्हा तो स्वतःची सुधारतो. या कथेतून वाचकांना उत्तम संदेश दिला आहे, केवळ दिसायला चांगले असून चालत नाही तर त्याला कामाची म्हणजे कर्तुत्वाचीही जोड द्यावी लागते, कर्तुत्वामुळेच माणसाला श्रेष्ठत्व मिळते, दिसायला सुंदर असून उपयोग नाही, म्हणून प्रत्येकाने आपल्या कार्य कर्तुत्वाने सरस ठरावे हे कथाकार संजय गोराडे यांना सुचवायचे आहे, त्यांची समज देण्याची पद्धत वाखाणण्याजोगी आहे, गर्वाचे घर नेहमी खाली असते हे त्यांनी योग्य रीतीने समजावून सांगितले आहे.
‘दिवा’ या कथेत दिवा आणि बल्ब यांचा छान संवाद वाचायला मिळतो. सध्याच्या प्रगतीच्या काळात जुन्या बाबी बाजूला पडून त्या जागी असंख्य नव्या सुखवस्तू आल्या आहेत, त्यामुळे जुन्या गोष्टी कोठेतरी अडगळीत पडल्या आहेत. आता तेलाने प्रकाशित करणारा दिवा जाऊन त्या जागी विद्युत बल्ब आला आहे, त्यामुळे बल्ब अडगळीत पडलेल्या दिव्याला क्षणोक्षणी हिणवतो. त्याला कमी लेखतो, विणकामाचा आहे, तुला फेकायला हवे असे टोचून बोलतो, पण दिवा मात्र अहंकाराने फुगलेल्या बल्बला शांत आणि संयमाने उत्तर देतो. त्याची समजूत काढतो, पण बल्ब मानायला तयार नसतो, शेवटी बल्बच बिनकामी ठरतो, तेव्हा त्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते, जगात कोणतीच गोष्ट कायम स्वरूपी राहत नाही, शिवाय विद्युत बल्ब शॉट झाल्यावर अडगळीत पडलेला दिवाच कामी येतो. त्यामुळे कुणाला कमी लेखणे अयोग्य आहे, सर्वजण ज्या-त्या ठिकाणी आवश्यक असतात, प्रत्येकाचे वेळेप्रमाणे महत्व असते. वेळ संपल्यावर वा निरुपयोगी ठरल्यावर प्रत्येक वस्तू कचराकुंडीतच फेकली जाते. या कथेतून बालकुमारांना किशोरांना कथाकाराने विनम्रपणे वागण्याचा, देता येईल तेवढी चांगली सेवा देण्याचा, सर्वांसोबत मिळून मिसळून वागण्याचा नकळत सल्ला दिला आहे. कोणाचेही अस्तित्व कायमचे राहत नाही. चलतीच्या काळात इतरांची मन दुखवू नका, आपण सर्व समसमान आहोत हे लक्षात घेऊन वागले पाहिजे असे कथाकाराला वाटते. वाईट बोलून पश्चाताप करण्यापेक्षा बोलण्याअगोदर सारासार विचार करावा हे कथाकाराला सांगायचे आहे.
‘उंटावरून शेळ्या हाकणे’ ही एक प्रशासकीय यंत्रणेवर आसूड ओढणारी कथा आहे, उंटावरून शेळ्या हाकणे ही एक मराठीत म्हण आहे, पण या म्हणीला अर्थ नीट न समजल्यामुळे त्याचा काय विपरीत परिणाम होतो, लोक अनेकदा अर्थाचा अनर्थ करून आपसात मतभेद वाढवतात हे टाळायचे असेल तर समोरच्या व्यक्तीचे काळजीपूर्वक ऐकून घेणे, त्याचा योग्य अर्थ लावणे आवश्यक आहे, सदर कथेत शासकीय यंत्रणेत कामचुकार लोक आपले काम कसे शिताफीने टाळतात. आपली जबाबदारी इतरांवर कसे लोटतात, उलट इतरांपेक्षा आपणच सक्रीय आहोत हे दाखवण्याचा कसा केविलवाणा प्रयत्न करतात. याचे कथेच्या रूपाने ज्वलंत उदाहरण मांडण्यात कथाकार संजय गोराडे यांना निश्चित यश आले आहे, त्यांच्या कथेचे विषय अत्यंत हलके फुलके आहेत, पण कथेची मांडणी, कथेचा प्लॅटफॉर्म, कथेतून संदेश देण्याची पद्धत कौतुकास्पद आहे, पाणी व कालिया डोह या कथाही उत्तम आहेत.
‘कोवळे कोंब’ हा कथाकार संजय गोराडे यांचा अतिशय उत्तम असा कथासंग्रह आहे. सर्वच कथा वाचनीय आहेत, कथेतील पात्र, आशय, विषय, संदेश, त्यातून केलेले प्रबोधन अत्यंत सरस आहेत, कथा वाचकाला खिळवून ठेवणाऱ्या आहेत. मनोरंजनाबरोबरच नितीमुल्यांचे धडे देणाऱ्या कथा आहेत. वाचकाला आत्मपरीक्षण करायला लावणाऱ्या कथा आहेत, कथेची भाषा ओघवती तर आहेच पण त्याहीपेक्षा रसाळ आहे, कथेत पाल्हाळाला कोठेही स्थान नाही, नेमकेपणा हेरून प्रभावी व परिणामकारक संवाद उभे केले आहेत. कथेची रचना आटोपशीर असून संदेशही तेवढाच मोलाचा दिलेला आहे. कथेत वाक्प्रचार, म्हणी यांचा योग्य ठिकाणीच चपखलपणे वापर केला आहे, संग्रहाचे मुखपृष्ठ, रेखाटने अत्यंत आकर्षक जमली आहेत, चटकन वाचकांचे मन वेधून घेण्याची ताकद त्यात आहे, हा बालकथासंग्रह वाचकाला तर हमखास आवडेलच यात तिळमात्र शंका नाही ; शिवाय कथाकारालाही नावारूपाला आणल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री वाटते. ‘कोवळे कोंब’ हा संपूर्ण बालकथासंग्रह मल्टीकलर असल्याने वाचकांच्या पसंतीला हमखास उतरणार यात शंका नाही.
कोवळे कोंब (बालकथासंग्रह)
लेखक – संजय द. गोराडे
प्रकाशन – दिलीपराज प्रकाशन पुणे
पृष्ठे – ६४
मूल्य – १७० रुपये
‘
सहायक पोलिस निरीक्षकावर चाळीस हजारांची लाच मागितल्याने गुन्हा नाशिक: प्रतिनिधी गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात…
मनमाड रेल्वे स्थानक हरवले...? मनमाड(आमिन शेख):- मनमाड रेल्वे स्थानक हरवले वाचून आश्चर्य वाटले हो तशीच…
ढगाळ वातावरण,दाट धुके व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान...! मनमाड: आमिन शेख गेल्या तीन ते चार दिवसांपासून…
नाशिक: प्रतिनिधी भंगार व्यापारी यांच्याकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना गुन्हे शाखा युनिट 2 चा…
नाशिक: प्रतिनिधी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचा आज होणारा दौरा रद्द झाला आहे. जिल्हाधिकारी…
नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास…