मंदिरातील दानपेटी, पितळी घंटाही लंपास
सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील कारवाडी येथील स्वामी समर्थ केंद्रामध्ये शुक्रवारी (दि. 30 जानेवारी) मध्यरात्री चोरीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी चांदी व पितळेची पूजेची ताटे व दानपेटी लंपास केली. याशिवाय याच केंद्राच्या शेजारी असलेल्या म्हसोबा मंदिरातील पितळी घंटाही चोरी करून नेल्याची माहिती आहे.
ही चोरी मध्यरात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घडली. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. फुटेजमध्ये जीन्स पॅन्ट व जर्किंन घालून, तोंडावर रुमाल बांधलेले दोन चोरटे चोरी करताना दिसत आहेत. शनिवारी सकाळी सेवेकरी स्वामी समर्थ मंदिरात पूजेसाठी गेले असता चोरीची ही घटना उघडकीस आली. स्वामी समर्थ केंद्राचे चालक संतोष जाधव यांनी घटनास्थळी भेट देत चोरी झाल्याची खात्री केल्यानंतर वावी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
या फिर्यादीवरून वावी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस तपास सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
स्थानिक लोकांनी सांगितले की, मंदिरातील चोरीमुळे परिसरातील भक्त आणि स्थानिक नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. पोलीस अधिकार्यांनीही नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि मंदिर परिसरात काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.