सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर बाजार समितीत सध्या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्यामुळे बाजारभाव घसरले आहेत. पावसाळी वातावरणात व्यापार्यांच्या खळ्यांवर कांदा ठेवायला जागा नसल्याने मंगळवारी (दि. 3) सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनेने घेतला आहे. याबाबतचे निवेदन व्यापारी संघटनेने बाजार समितीचे सभापती श्रीकृष्ण घुमरे यांना दिले आहे.
सोमवारी सिन्नर बाजार समितीत 41 पिकअप व 152 ट्रॅक्टर अशा एकूण 193 वाहनांतून सुमारे 4,210 क्विंटल कांद्याची आवक झाली. यावेळी कांद्याला जास्तीत जास्त 1,175 रुपये, किमान 400 रुपये तर सरासरी 975 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. चांगल्या दर्जाच्या कांद्यालाही 900 ते 1,000 रुपयेच दर मिळाल्याने शेतकरी नाराज झाले आहेत.
कांद्याचे दर खूपच कमी झाल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याच्या तक्रारी शेतकर्यांकडून व्यक्त होत आहेत. वाढती आवक, पावसाळी हवामान आणि कांदा साठवण्यासाठी जागेची कमतरता लक्षात घेता मंगळवारी लिलाव बंद ठेवण्याची मागणी व्यापारी संघटनेने केली आहे.
ही मागणी व्यापारी संघटनेचे बी. एम. चकोर, योगेश्वर ट्रेडिंग कंपनी, रतनकाका अँड कंपनी, डी. एस. लढ्ढा अँड कंपनी, अनिल लहामगे, कन्हैयालाल पारख, विजय तेलंग, भैरवनाथ ट्रेडर्स आदी व्यापार्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, मंगळवारी शेतकर्यांनी बाजार समितीच्या आवारात कांदा लिलावासाठी माल आणू नये, असे आवाहन सभापती श्रीकृष्ण घुमरे, सचिव विजय विखे आणि संचालक मंडळाने केले आहे.
Onion auction closed today due to lack of space to store farm produce