…तर एकतर्फी सुनावणी घेऊ

मनपाला उच्च न्यायालयाने फटकारले; साधुग्राम वृक्षतोड प्रकरण

नाशिक : प्रतिनिधी
तपोवनातील साधुग्राममधील प्रस्तावित वृक्षतोडीविरोधात दाखल याचिकेवर मंगळवारी (दि.17) महापालिका व वृक्ष प्राधिकरणाने प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने महापालिकेला उच्च न्यायालयाने फटकारले. 24 फेब्रुवारीला प्रतिज्ञापत्र सादर न केल्यास एकतर्फी सुनावणी घेऊ, असेही खडे बोल महापालिकेला सुनावण्यात आल्याचे याचिकाकर्ते अ‍ॅड. नितीन पंडित यांनी सांगितले.
तपोवनातील वृक्षतोडीचा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच गाजतो आहे. पर्यावरणप्रेमींनी तपोवनातील एकही झाड तोडू देणार नसल्याचा इशारा देत वेगवेगळे आंदोलन करत लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. वृक्षतोडीला स्थगिती मिळावी याकरिता उच्च न्यायालयात अ‍ॅड. पंडित यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. परंतु महापालिका प्रशासन गेल्या तीन- चार महिन्यांपासून निवडणुकीच्या धामधुमीत असल्याने सुनावणी पुढे घेण्याची विनंती केली होती. मात्र निवडणूक झाल्यानंतर मनपा व वृक्ष प्राधिकरणास मंगळवारी न्यायालयात अंतरिम अर्जावर प्रतिज्ञापत्र सादर करणे अपेक्षित होते. यावेळेसही मनपाने वेळकाढूपणा केल्याचे अ‍ॅड. पंडित यांनी म्हटले.

आता शेवटची संधी

उच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या अंतरिम अर्जावर नाशिक महानगरपालिकेला व वृक्ष प्राधिकरणास न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्याकरिता शेवटचा आठवड्याची संधी देण्यात आली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास एकतर्फी सुनावणी करण्यात येईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *