रामललाच्या दानपेटीतील रक्कम चोरणार्‍यांना शिक्षा तर होणारच!

जगभरातील कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्यास्थित श्रीराम मंदिरातील दानपेटीत जमा होणार्‍या रकमेत अपहार झाल्याच्या बातम्या मागील काही दिवसांपासून प्रसिद्ध होत आहेत. श्रीराम मंदिर ट्रस्टने श्रीराम मंदिरांसह संपूर्ण दर्शन मार्गात चार डझन अर्पण पेट्या बसवल्या आहेत. या दानपेट्यांत जमा होणारी रक्कम मोजण्यासाठी ट्रस्टने एसबीआय बँकेला अधिकृत केले असून, बँकेने एका खासगी एजन्सीला याचे कंत्राट दिले आहे.
या एजन्सीच्या कर्मचार्‍यांनी हा अपहार केल्याचे छुप्या पद्धतीने लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून लक्षात आले आहे. अविनाश शुक्ल नावाच्या कर्मचार्‍याने आणखी चार-पाच कर्मचार्‍यांच्या मदतीने हा अपहार केल्याचा संशय असल्याने त्यांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. अविनाशने पाच लाख रुपये लंपास केल्याचे मान्य केले आहे. सदर रक्कम आपल्या खात्यातून काढून पुन्हा ट्रस्टच्या खात्यात जमा केली आहे. विरोधी पक्षांनी दानपेटीतील रक्कम चोरीला गेल्याचा आरोप केल्यानंतर या प्रकरणाचे विशेष अन्वेषण पथकाद्वारे अन्वेषण करण्याची मागणी श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र न्यासाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली. मुख्यमंत्र्यांनी अवघ्या काही तासांत पथकाची स्थापना केली आणि त्याच दिवशी लवकुश मिश्रा याला ताब्यात घेण्यात आले.
अन्वेषण यंत्रणेला मिश्रा याच्या घरी दहा लाख रुपये सापडले. त्याने काही पैसे कपाटात, तर काही पैसे शेणाच्या ढिगार्‍याखाली लपवले होते. याप्रकरणी आणखी एका कर्मचार्‍याचे अन्वेषण चालू असल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडेही मिश्रा याच्याप्रमाणेच देणगीची रक्कम मोजण्याचे काम होते. संशयित असलेल्या दोन्ही कर्मचार्‍यांना प्रत्येकी दरमहा 18 ते 20 हजार रुपये पगार दिला जातो; परंतु अलीकडच्या काही महिन्यांत त्यांच्या संपत्तीत अचानक वाढ झाल्याने अन्वेषण पथक या उत्पन्नाचा स्रोत शोधत आहे. एका कर्मचार्‍याने जवळपास दीड कोटीची जमीन खरेदी केली आहे. दुसर्‍याने 40 लाखांंचे नवीन घर खरेदी केल्याचे आता समोर आले आहे. आतातर पन्नासहून अधिक कर्मचारी संशयाच्या भोवर्‍यात आले असून, गेल्या काही महिन्यांत ते अचानक करोडपती झाल्याने त्यांच्याही मालमत्तेची चौकशी करण्यात येणार आहे. प्राथमिक अंदाजात 200 कोटींचा अपहार झाल्याचे सांगण्यात येत असले तरी भविष्यात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
कर्मफळ न्यायानुसार केलेल्या प्रत्येक चांगल्या-वाईट कर्माचे फळ आपल्याला मिळत असते. चुकीचे कर्म पाप रूपाने, तर चांगले कर्म पुण्यरूपाने आपल्या संचितामध्ये जमा होते. त्याचे फळ आज नाही, तर उद्या प्रारब्धाच्या रूपाने मिळतेच मिळते. भगवंतावर श्रद्धा असणारा भक्त चराचरांत भगवंत असल्याचा भाव ठेवून कर्म करतो. भगवंत सर्वत्र आहे आणि तो आपली प्रत्येक कृती पाहत आहे यावर त्याची नितांत श्रद्धा असते. त्यामुळे कर्म करताना तो भगवंताला अपेक्षित असेच कर्म करतो. इथे तर साक्षात भगवंताच्या समोरच अपराध घडला आहे. याचे योग्य ते फळ चोरांना भविष्यात मिळेल, यात शंका नाही. भक्ताने कष्टाने कमावलेले धन तो काही अंशी भगवंताच्या चरणी अर्पण करत असतो. अर्थात, भगवंताला भक्ताच्या धनाची अपेक्षा नसली तरी भगवंताच्या कार्याला धनाची गरज भासतेच. शिवाय भगवंताच्या चरणी भक्ताने निष्काम भावनेने धन अर्पण केल्याने तो त्याचा त्यागसुद्धा होतो. अध्यात्मात आणि साधनेत त्यागाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्याच्याकडे धन आहे त्याने भगवंताच्या चरणी धन अर्पण करावे, ज्याच्याकडे धन नाही त्याने ईश्वरी कार्यात अधिकाधिक सेवा करून तन अर्पण करावे.
मनाने नामस्मरण करणे हा मनाचा त्याग झाला आणि ज्याच्याकडे तन-मन आणि धन सर्वकाही आहे त्याने ते यथायोग्य स्वेच्छेने अर्पण करावे. मंदिरात विराजमान रामलला ही केवळ मूर्ती नसून साक्षात प्रभू रामचंद्र याठिकाणी वसले आहेत या भावाने देशभरातून भक्तगण अयोध्या नगरीत येतात. आपल्यातील सर्वकाही भगवंताला सांगत असतात, यथायोग्य दान पेटीत समर्पित करत असतात. आपल्यासमोर साक्षात प्रभू श्री रामचंद्र आहेत आणि आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट ते ऐकत आहेत. आपण दिलेले अर्पण प्रभूंच्या चरणी पोहोचत आहे, ही त्यांची धारणा असते. त्यामुळे दानपेटीत समर्पित होणारी रक्कम हे केवळ धन नसून त्याच्यामागे ते देणार्‍याची श्रद्धा जोडलेली असते. त्यामुळे त्या धनाचे रूपांतर अर्पणात झालेले असते.
दानपेटीवर डल्ला मारणार्‍या कर्मचार्‍यांनी केवळ रक्कम लंपास केली नसून त्यांनी भक्तांच्या श्रद्धेचा भगवंताच्या दारातच अवमान केला आहे. मंदिरात जमा होणार्‍या देवधनाचा हिशोब ठेवण्याचे दायित्व मंदिर ट्रस्टने एसबीआय बँकेला दिले आहे, तर बँकेने त्याचे कंत्राट एका एजन्सीला दिले आहे. या एजन्सीचे कर्मचारी श्रीरामाचे भक्त आहेत का, याची कोणतीही खात्री बँकेने नक्कीच केली नसावी. भगवंताचा खरा भक्त एकवेळ आपल्या पदरचे धन देवकार्याला बहाल करेल मात्र, देवधन लंपास करण्याचा विचारही त्याच्या मनाला शिवणार नाही. मंदिर ट्रस्टने एवढे मोठे दायित्व देताना या गोष्टीचा विचार का केला नाही? भगवंताच्या कार्यात धनाची कधी कमतरता भासत नाही. आज जितक्या धनाचा अपहार झाला त्याच्या कैकपटीने धन भगवंताच्या दारी जमा होईल. मात्र, ज्यांनी ज्यांनी आपले दायित्व विसरून चुकीचे कर्म केले त्याचा हिशोब आज ना उद्या नक्की होईल.

Those who stole money from Ram Lalla’s donation box will certainly face punishment!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *