क्रांतिसूर्य-म.ज्योतिबा फुले यांचे विचार व कार्य
भारतात इंग्रजांची सत्ता दृढ झाली आणि इंग्रजी शिक्षणाच्या प्रवाहाबरोबर नवे विचार, नवीन कल्पना ,नवीन तत्वज्ञानाचा प्रसार झाला. पाश्चिमात्य विचार, आचार, संस्कृती यांची भारतीयांना ओळख झाली. बुध्दिनिष्ठा, विज्ञाननिष्ठा,मानवता, राष्ट्रवाद अशी मूल्ये भारतीयांनी आत्मसात केली.भारताबाहेरील जगाची जाणीव सुशिक्षित तरुणांना झाली होती. फ्रेंच राज्यक्रांतीने दिलेल्या स्वातंत्र्य ,समता, बंधुता या मूल्यांचे महत्त्व त्यांना पटले होते. त्यामुळे भारतीय समाजाच्या सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक क्षेत्रात बदल होत होते.भारतीय समाजातील मागासलेपण वैचारिक दारिद्र्य, अंधश्रद्धा, जातीभेद, उच्चनीचतेच्या भ्रामक कल्पना दूर करण्यासाठी शिक्षण घेतलेले सुशिक्षित तरूणांनी आपल्या लेखनातून, प्रत्यक्ष कृतीतून ,संघटनांच्या माध्यमातून तत्कालीन भारतीय समाजात जनजागृती करण्यास सुरुवात केली. या अनेक सुशिक्षित तरुणांपैकीच एक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले.त्यांचे वडिल,काका पेशव्यांना फुले पुरवण्याचे काम करत असल्यामुळे त्यांचे गो-हे हे मूळ आडनाव असले तरी पुढे फुले म्हणून ओळखले जाऊ लागले.त्यांच्यावर थॉमस पेन या लेखकाच्या ‘The Right Of Man’ या पुस्तकाचा प्रभाव होता.
त्या काळात भारतातील स्त्रियांची स्थिती अत्यंत दयनीय होती. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता .समानतेची वागणूक दिली जात नव्हती. स्त्रियांनी शिक्षण घेणे म्हणजे अधर्म करणे असे मानले जात होते.बालविवाह, जरठकुमारी विवाह ,हुंडापद्धती, सतीप्रथा, केशवपन, विधवा विवाहास विरोध अशा प्रथा समाजात होत्या. यासर्व अनिष्ट प्रथाविरुद्ध महात्मा फुलेंनी आवाज उठवला. स्त्रियांचे अज्ञान ,परावलंबित्व ,’चूल आणि मूल’ पर्यंत असणारं कार्यक्षेत्र,त्यांची होणारी कुचंबणा हे सर्व स्त्रीशिक्षणाचा अभाव असल्यामुळेच होत आहे असे त्यांचे ठाम मत होते. स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे . स्त्री शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांनी मनोमन ठरवले. म्हणतात ना, “Charity begins at home” यानुसार त्यांनी सर्वप्रथम आपली पत्नी सावित्रीबाई हिला साक्षर करून स्त्रीशिक्षणाचा पाया रोवला. सनातन्यांचा विरोध, जननिंदा सहन करून त्यांनी सर्वप्रथम १८४८ मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली.विधवा स्त्रीला देखील आनंदाने जगण्याचा अधिकार आहे.स्त्रियांना एक नियम लागू करणे व पुरुषांना दुसरा नियम लागू करणे हा निव्वळ पक्षपात आहे.स्त्री देखील एक माणूस आहे. म्हणूनच त्यांनी पुण्यामध्ये सर्वप्रथम १८६४ मध्ये विधवेचा पुनर्विवाह घडवून आणला.जातीव्यवस्था ही ईश्वरनिर्मित नाही तर मानवनिर्मित असुन अन्यायकारक आहे हे त्यांनी पटवून दिले. त्यांनी स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला करून दिला.अत्याचारापासून गुलामगिरीत असलेल्या तथाकथित शूद्रातिशूद्रांना त्यांनी त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली.याकरीता त्यांनी १८७३ मध्ये’सत्यशोधक समाजाची’ स्थापना केली. “सर्वसाक्षी जगत्पती त्याला नको मध्यस्थी “असे या संस्थेचे ब्रीद वाक्य होते.अनाथ मुलांसाठी बालगृह देखील स्थापन केले.
शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे, हे जोतिबांनी १८८२च्या हंटर शिक्षण आयोगापुढे मांडले होते. यावरून त्यांचा द्रष्टेपणा लक्षात येतो. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केल्यास विद्यार्थी संख्येत वाढ होईल.गुणवत्तापूर्ण,दर्जेदार शिक्षणासाठी त्यांनी शिक्षक- प्रशिक्षणाची आवश्यकता तेव्हा प्रतिपादन केली होती. तसेच देशातील बहुतांश जनता ग्रामीण भागात राहते त्यामुळे त्यांनी ग्रामीण भागातील मुला मुलींच्या प्राथमिक शिक्षणावर भर दिला होता. देशातील सामाजिक, आर्थिक गुलामी नष्ट करण्यासाठी शिक्षण एकमेव प्रभावी साधन आहे असे त्यांचे स्पष्ट मत होते. त्यासाठी बहुजन समाजाला मानवी जीवन जगण्यास सक्षम बनवणारे ,उद्योगी व जीवन उपयोगी शिक्षण देण्यात यावे अशी त्यांची विचारसरणी होती.
१९६६ मधील कोठारी आयोगाने सांगितलेल्या त्रिभाषा सूत्री संदर्भात म.फुलेंनी कित्येक वर्षे अगोदर सरकारला त्रिभाषा सुत्राचा अवलंब करण्याविषयी सांगितले होते. तसेच गरीब ,होतकरू विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती, वस्तीगृह यावरही त्यांचा भर होता.शिक्षण जीवनाचा आधार असून जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे असे त्यांचे मत होते. ज्ञानाधारित शिक्षणाबरोबर कौशल्यपूर्ण मूल्याधिष्ठित शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादित केली होती. त्यांच्या शाळेत त्यांनी शेती व औद्योगिक शिक्षण सक्तीचे केले होते.”विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त संपले ,वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले.”असे म.फुले म्हणत असत.
भारतीय शेती ही ‘पावसावरील जुगार’ असल्याने ती अनिश्चित स्वरूपाची आहे. त्यातून मिळणारे उत्पन्न अनिश्चित स्वरूपाचे असल्याने शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतो आणि म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महात्मा फुलेंनी “शेतकऱ्याचा आसूड” नावाचा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या दुरवस्थेची कारणे व त्यावरील उपाय सुचविले आहेत. त्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. शेतकऱ्यांचे विदारक जीवन व दारिद्र्याची वास्तविकता त्यांनी विशद केली आहे.आजच्याप्रमाणेच पूर्वीही शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा चिंतनाचा विषय होता.पूर्वीही शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळून कणेरीच्या मुळ्या वाटुन त्या खाऊन आत्महत्या करीत असे. त्यावर उपाययोजना म्हणून पावसाच्या पाण्यावर अवलंबून न राहता जलसिंचनाच्या सुविधा करणे उदा. धरणे बांधणे, कालवे काढणे, विहिरी खोदणे ,तलाव बांधणे इत्यादीवर भर दिला होता. वृक्षतोडीस आळा घालून शेतीचे आधुनिकीकरण करण्यात यावे तरच शेतकऱ्यांचे प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होईल असे त्यांचे ठाम मत होते. जनावरे,रानडुकरे यांनी जर शेतीचे नुकसान केले तर सरकारने नुकसान भरपाई देण्याबाबत कायदा करावा अशी मागणीही त्यांनी त्यावेळेस केली होती.म. फुले यांनी “ब्राह्मणांचे कसब “,”शेतक-यांचा आसूड”, “सार्वजनिक सत्यधर्म” या पुस्तकांच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. स्त्री-पुरुष अथवा माणसामाणसांमध्ये भेद निर्माण करणाऱ्या चालीरीतींवर कडक टीका केली. “गुलामगिरी” हा ग्रंथ लिहून तो त्यांनी अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना समर्पित केला आहे .”अस्पृश्यांची कैफियत” हा त्यांचा अप्रकाशित ग्रंथ असून “तिसरे रत्न” नावाचे नाटकही त्यांनी लिहिले होते .तसेच “दीनबंधू” या वृत्तपत्रातून देखील त्यांनी समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा त्यांना कडाडून विरोध केला. अनिष्ट रूढी,परंपरा,जातीयता ,उच्च-नीचता,स्पृश्य-अस्पृश्यता, अंधश्रद्धा,स्त्री-पुरूष असमानता, गुलामगिरीच्या शृंखलांमध्ये जखडलेल्या समाजाला आपल्या कार्याच्या माध्यमातून मुक्त केले.त्यांनी केलेल्या कार्याच्या गौरवार्थ १९८८ मध्ये मुंबईतील सभेत त्यांना जनतेने ‘महात्मा’ हि उपाधी दिली.महाराष्ट्राचे ‘मार्टिन ल्युथर’ असेही म.फुले यांना म्हटले जाते.
म.फुले यांनी केलेले समाजपरिवर्तनाचे कार्य, राष्ट्र उभारणीसाठी दिलेले अमूल्य योगदान या सर्वांपुढे व्यक्ती नतमस्तक झाल्याशिवाय रहात नाही.अशा या थोर समाजसुधारक,शिक्षण महर्षीविषयी कृतज्ञता व्यक्त करताना म्हणावेसे वाटते की,
‘घराघरातून साक्षरतेची तूच लाविलीस पणती लोपविलासे अज्ञानतिमीर उजळूनी ज्ञानज्योती.’
‘नावाप्रमाणेच ठरलास तू ‘ज्योतींचा’,’बा’,
क्रांतीसूर्य होऊनी उजळिले अवघ्या जगा’……..
आरती डिंगोरे
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…
सिडको : विशेष प्रतिनिधी -मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काठे गल्लीतील अनधिकृत स्थळ महापालिका…
नाशिक: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज झालेल्या कॉंग्रेस प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील…
मनमाडला रेल्वे कर्मचाऱ्याचा कांदे भरत असतांना शॉक लागून मृत्यू मनमाड : प्रतिनिधी मनमाडनजीक असलेल्या नागापूर…