कजवाडेत तिघांचा बुडून मृत्यू

धरणात मेंढ्या धुताना दुर्घटना

मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव तालुक्यातील कजवाडे येथील सातवडे धरणात शनिवारी (3 ऑक्टोबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू झाला. भूषण रघुनाथ कर्नर (वय 13), हरी बाबू गोयेकर (वय 28) आणि बाबू गुथा गोयेकर (वय 54) असे मृतांची नावे आहेत. या दुर्घटनेमुळे कजवाडे गावासह संपूर्ण परिसरात मोठी शोककळा
पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघेही जण सातवडे धरणावर मेंढ्या धुण्यासाठी गेले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास मेंढ्या धूत असताना 13 वर्षीय भूषण कर्नर याला धरणातील पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि तो खोल पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी हरी गोयेकर यांनी त्वरित पाण्यात उडी घेतली, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तेदेखील बुडाले. ही भीषण परिस्थिती पाहताच मदतीसाठी पुढे आलेले बाबू गोयेकर हेदेखील त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात पाण्यात उतरले आणि दुर्दैवाने ते तिघेही पाण्याचा लोट व खोलीमुळे बुडाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिघांना बाहेर काढून तातडीने मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयात आवश्यक कायदेशीर प्रक्रिया व शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा असा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Three drown in Kajvade

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *