‘एमपीएससी’मध्ये पूर्ण शुद्धीकरण हवे : संजय राऊत

रोहित पवारांचे आंदोलन सुरूच; हजारो विद्यार्थ्यांचा रस्त्यावर ठिय्या

पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी)च्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवारांचे पुण्यात सलग चौथ्या दिवशी आंदोलन सुरू आहे. हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी रविवारी संध्याकाळी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी बोलताना, सरकार तरुणांचे ऐकणार नसेल तर मग कोणाचे ऐकणार? असा सवाल त्यांनी केला. एमपीएससीमध्ये पूर्ण शुद्धीकरण हवे, या गर्जना फडणवीसांच्या कानापर्यंत जाऊ द्या, अशा शब्दांत संजय राऊत गरजले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या विषयावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. सीजेपी अध्यक्ष अभिजित दीपके यांनीही आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. दुसरीकडे, मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य झालेल्या असताना पुन्हा हे आंदोलन कशासाठी, असा सवाल करत आंदोलक विद्यार्थ्यांच्या हेतूबद्दल शंका घेतली. हे जणू काँग्रेसचेच आंदोलन वाटते, असेही ते म्हणाले.
राऊत म्हणाले की, हजारो विद्यार्थी रस्त्यावर बसले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात हीच स्थिती आहे. तरुण जेलमध्ये जायला तयार आहेत. पण हे सरकार तरुणांचे ऐकायला तयार नाही. मग हे कोणाचे ऐकणार? राज्यात सर्वत्र विद्यार्थी रस्त्यावर उतरले तर मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांनाही मंत्रालयातून बाहेर पडणे मुश्कील होईल, असा इशाराही त्यांनी दिला. तरुणांमध्ये देशात हवे ते करून घेण्याची ताकद आहे. त्यांच्याच आंदोलनामध्ये सरकार फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. हे सरकार तरुणांचे असते तर त्यांनी मागण्या समजून घेतल्या असत्या. एमपीएससीमध्ये वरपासून खालपर्यंत शुद्धीकरण करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. राऊत म्हणाले की, सरकार निवडणुका आणि सरकार बनवताना भ्रष्टाचार करत आहे. तिथे ज्ञानेश कुमार बसले आहेत, इथे आणखी कुणाला बसवले आहे. ज्ञानेश कुमारांना जावेच लागेल. तुमच्या मनामध्ये जोपर्यंत आत्मविश्वास आहे, तोपर्यंत कोणताही चुकीचा माणूस महत्त्वाच्या पदांवर बसवला जाणार नाही. जेव्हा देशाच्या तरुणांना जाग येते, तेव्हा दिल्लीतल्या आणि महाराष्ट्रातील नेत्यांचे चेहरे पडलेले बघायाला मिळतात, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

 

Complete overhaul needed in MPSC: Sanjay Raut

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *