राज्यात उष्माघाताने तिघांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात सूर्य आग ओकतोय. सकाळी सात वाजल्यापासूनच तीव्र ऊन जाणवत असून, राज्य उष्णतेच्या ‘रेड झोन’मध्ये आले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील काही जिल्ह्यांचा समावेश ‘अति उच्च उष्णता धोका’ श्रेणीत करण्यात आला आहे. उष्माघातामुळे राज्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
अकोला, हिंगोली आणि वाशिम या ठिकाणी उष्माघातामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. हिंगोलीत बसस्थानकावर 30 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. वाशिममध्ये चार दिवसांपूर्वी उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांचे तापमान 40 च्या पुढे गेल्याची नोंद झाली आहे.
उष्माघातामुळे हिंगोलीमध्ये पहिला बळी गेला आहे. हिंगोली शहरातील बसस्थानक परिसरात 30 वर्षीय तरुणाचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. शेख रफिक शेख उस्मान असे उष्माघाताने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात सध्या तापमानाने मोठा उच्चांक गाठला आहे, सकाळी आठ वाजल्यापासून तापमानाचा पारा वाढण्यास सुरुवात होत आहे. दुपारी चारपर्यंत हिंगोली जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्यविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यात उष्माघाताचे 17 रुग्ण
मागील दीड महिन्यात ऊन वाढल्याने राज्यात उष्माघाताचे 17 पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. एक मार्च ते 15 एप्रिलदरम्यान उष्माघाताच्या 17 रुग्णांची नोंद झाली आहे. रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यांत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत उष्माघातामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक चार रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यात तीन रुग्ण आढळले आहेत. जालना आणि पालघर येथे प्रत्येकी दोन रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात आढळलेल्या तीन रुग्णांपैकी दोन रुग्ण बुधवारी आढळले. गडचिरोली, गोंदिया, जळगाव, नंदुरबार, नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांत प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे.

वाशिमला एकाचा मृत्यू

वाशिमच्या अनसिंग येथील नर्सरी परिसरात एका 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली. बुधवारी मृतदेह आढळला. मृत व्यक्ती अनसिंग पोलिस स्टेशन हद्दीतील शेलू बुद्रुक येथील केशव गाढे आहे. त्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मृतदेह चार ते पाच दिवसांआधी असल्याचा अंदाज आहे.

 

Three people died due to heatstroke in the state

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *