सिन्नरच्या आखाड्यात 160 मल्लांचा थरार

35 शाळांचा सहभाग,

शालेय कुस्ती स्पर्धेत 14, 17 व 19 वर्षांखालील गटात चुरशीच्या लढती;

विजेत्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नरच्या राजश्री शाहू महाराज तालीम संघाच्या आखाड्यात भरलेल्या तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत 35 शाळांमधील 160 मल्लांनी सहभाग घेतला. 14, 17 आणि 19 वर्षांखालील मुलांच्या फ्रीस्टाइल कुस्तीच्या विविध वजनी गटांत झालेल्या चुरशीच्या लढतींनी आखाडा गाजला. विजयी खेळाडूंची नाशिक येथे होणार्‍या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक अनिल सरवार, आशाताई करपे, सविता कोठुरकर, कल्पना आव्हाड, भीमराज चव्हाण, देविदास वाजे, विनोद शितोळे, अनिल नांगरे, शैलेश नाईक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. विविध वजनी गटांतील सामन्यांमध्ये मल्लांनी ताकद, कौशल्य आणि डावपेचांचे प्रभावी प्रदर्शन केले.
यावेळी सिन्नर तालुका क्रीडा संयोजक प्रा. पी. एम. खैरनार, प्राचार्य सोमनाथ काळे, के. झेड. राठोड, सुनील शिंदे, एम. एम. शेख, दीपक थोरात, विलास सातपुते, विलास गोसावी आदी क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंसह स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंना भाजपा नेते उदय सांगळे यांच्या वतीने अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. पंच म्हणून बाळू भाऊ बिन्नर, एन.आय.एस. मार्गदर्शक दिलीप सोनवणे आणि सुनील येवले यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन किरण मिठे यांनी केले, तर आभार रामनाथ जाधव यांनी मानले.

मागील वर्षीच्या गुणवंत मल्लांचा सत्कार

मागील वर्षी शालेय कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या साहिल साबळे, वेदांत तुकाराम उगले, यश ढाकणे, कुणाल आव्हाड, चैतन्य सोपान थोरात, यश संजय लोंढे आणि शिवले प्रकाश पवार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Thrilling spectacle featuring 160 wrestlers in the Sinnar arena.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *