दोडीतील महिलेच्या मृत्यूचे गूढ उकलले

18 वर्षीय संशयित ताब्यात, साथीदार फरार

सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील नारळाच्या बागेतील विहिरीत 45 वर्षीय महिलेचा मृतदेह हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. या घटनेला आता धक्कादायक वळण मिळाले असून, महिलेचा खून करून मृतदेह विहिरीत फेकण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी गावातीलच अनिल शरद पगारे (18) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, आणखी एका संशयिताचा शोध सुरू आहे.
संगीता मधुकर जाधव (45) या तीन दिवसांपासून बेपत्ता होत्या. रविवारी गावातीलच आव्हाड यांच्या मालकीच्या नारळाच्या बागेतील विहिरीत संगीता जाधव यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे हात-पाय बांधलेले आणि गळ्याला साडी बांधलेली असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा आत्महत्येचा प्रकार नसून घातपाताचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. दरम्यान, संशयितांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी कुंभार समाजाच्या संघटनेने सोमवारी जिल्हा रुग्णालयासमोर रास्ता रोको आंदोलन केले. तसेच वावी पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले. याप्रकरणी मयताची बहीण सुनीता वाकचौरे (50, रा. पिंपळवाडी, ता. राहाता) यांच्या फिर्यादीवरून वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पथकात उपविभागीय पोलिस अधिकारी के. के. पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल मोरे, उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, वावीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष शेळके आणि पोलिस हवालदार शहाजी शिंदे यांचा समावेश आहे.

निफाडमधून संशयित ताब्यात

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. धोंडोपंत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि वावी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान निफाड तालुक्यातून अनिल पगारे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासोबत असलेल्या दुसर्‍या संशयिताचा पोलिस शोध घेत आहेत.

हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट

महिलेच्या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ताब्यात घेतलेल्या संशयिताची चौकशी सुरू असून, हत्येमागे नेमका कोणता हेतू होता, तसेच या घटनेत आणखी कोणी सहभागी आहे का, याचा पोलिस तपास करीत आहेत. पसार असलेल्या संशयिताचा शोध सुरू आहे.

 

Mystery behind woman’s death in Dodi solved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *