जेलरोड येथील पुलावर ट्रक अडकून वाहतूक ठप्प

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
मंगळवारी पहाटे जेलरोडच्या पुलावरील मोठ्या खड्ड्यात अवजड मालवाहूतक ट्रक फसल्याने जेलरोड ते नांदूरदरम्यानची वाहतूक तब्बल पाच तास ठप्प होती. पोलिसांनी तीन जेसीबी व एक हायवाच्या सहाय्याने हा ट्रक हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान, जेलरोड, नाशिकरोड परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असतानाही नगरसेवक घराबाहेर पडत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
कुंभमेळ्यासाठी खोदलेल्या जेलरोडवर अनेक ठिकाणी धोकादायक खड्डे तसेच आहेत. जेलरोडच्या उड्डाणपूलावर नांदूरनाक्याकडे जाणार्‍या रस्त्यावर कुंभमेळा कामासाठी खोदलेला भला मोठा खड्डा तसाच आहे. मंगळवारी पहाटे नीलकंठेश्वर मंदिरासमोरील या खड्ड्यात अवजड ट्रक अडकला. प्रयत्न करूनही तो बाहेर येत नव्हता. तो फसल्याने जेलरोडची वाहतूक पाच तास ठप्प होती. वाहतूक पोलिसांनी तीन जेसीबी आणि एक हायवा बोलावून हा अवजड ट्रक खड्ड्यातून बाहेर काढला.
त्यानंतर थोड्या वेळाने वाहतूक पूर्ववत झाली. जेलरोड, नांदूरनाका, नाशिकरोड परिसरात कुंभमेळ्याच्या कामासाठी खोदलेले रस्ते अनेक ठिकाणी तसेच आहेत. त्यामुळे अपघात होत असून, वाहतूकीचा खोळंबा होत आहे. पावसाने रस्त्यावर आणखी खड्डे पडून रस्ता धोकादायक झाला आहे. चार दिवसांपासून या खड्ड्यात वाहने अडकत आहेत. रविवारी पिकअप या खड्ड्यात अडकली होती. प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि रेंगाळलेल्या कामामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या पुलावर सर्वत्र खड्डे पडले आहेत. परिसरातील रस्ते तातडीने दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

Traffic stalled after a truck got stuck on the Jail Road bridge.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *