त्र्यंबकेश्वर परिसरातील 300 वर्षे जुन्या मंदिरालाही धोका!
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात दर्शनपथ (कॉरिडॉर) बांधण्याच्या प्रकल्पासाठी शहरात मोठी वृक्षतोड केली जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पंचायत समिती कार्यालयाच्या आवारातील सुमारे 70 ते 300 वर्षे वयाचे 15 मोठे वृक्ष आणि इतर लहान वृक्ष तोडले जाणार आहेत. शहराच्या मध्यवस्तीत आणि मंदिरापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर असलेल्या या हिरव्यागार झाडांमुळे येथील पर्यावरण शुद्ध व प्रसन्न राहते. या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या परिसरात बदाम, सुपारी, उंबर, नारळ, जांभूळ, गुलमोहर, कदंब, चिंच आणि काही दुर्मीळ जातीचे 50 फूट उंचीचे वृक्ष आहेत. यांची दाट सावली आणि उत्साहवर्धक वातावरणामुळे येथे रंगीबेरंगी पक्ष्यांचा वावर वाढला होता. मात्र, विकासकामांसाठी सुरू असलेल्या अजस्त्र यंत्रांच्या धडधडीमुळे पक्षी परागंदा झाले आहेत. या प्रकल्पासाठी यापूर्वीच शासकीय इमारती, धर्मशाळा आणि अनेक व्यापार्यांच्या दुकानांचे स्थलांतर करण्यात आले असून, आता प्राचीन वृक्षसंपदेचा बळी दिला जात आहे.
मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
त्र्यंबकेश्वर मंदिरापासून शंभर मीटरपेक्षा कमी अंतरावर 130 मीटर खोल पाया घेण्यासाठी यांत्रिक हातोड्यांचा वापर केला जात आहे. या तीव्र कंपनांमुळे आजूबाजूच्या वास्तू आणि 300 वर्षे जुन्या राष्ट्रीय स्मारक असलेल्या मुख्य मंदिर वास्तूच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासन आणि भारतीय पुरातत्त्व विभाग या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.
पर्यावरणप्रेमींचा विरोध
विकासाच्या नावाखाली त्र्यंबकनगरीचे सौंदर्य आणि निसर्गसंपदा नष्ट केली जात असल्यामुळे भाविक व नागरिकांमध्ये नाराजी आहे. या संभाव्य वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींनी सक्त विरोध दर्शवला असून, वृक्षतोड सुरू झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
Trees to be felled for the ‘Darshan Path’