मालेगावात पारा 38.4 अंशांवर

सप्टेंबरच्या मध्यातील 28 अंशांवरून तापमानात 10 अंशांची वाढ

मालेगाव : प्रतिनिधी
पावसाचा खंड कायम असतानाच मालेगाव शहरातील कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असून, 5 व 6 ऑक्टोबरला कमाल तापमानाने 38.4 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. 4 ऑक्टोबर रोजीही कमाल तापमान 38.2 अंशांवर होते. त्यामुळे ऑक्टोबरच्या सुरुवातीला शहरात उन्हाचा चटका कायम असून, दिवसभर उकाडा जाणवत आहे.
शहरातील तापमान नोंदीनुसार, सप्टेंबरच्या मध्यात कमाल तापमानात लक्षणीय घट झाली होती. 12, 13 व 14 सप्टेंबर रोजी कमाल तापमान 28 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. त्यामुळे या काळात वातावरणात तुलनेने गारवा जाणवत होता. मात्र, त्यानंतर तापमानाने पुन्हा वाढीचा कल घेतला. 15 सप्टेंबरला कमाल तापमान 35 अंशांवर, तर 24 सप्टेंबर रोजी पुन्हा 35 अंशांवर पोहोचले.
महिनाअखेरीस तापमानवाढ अधिक तीव्र झाली. 28 सप्टेंबर रोजी कमाल तापमान 37.2 अंश, 29 सप्टेंबर रोजी 37.4 अंश, तर 30 सप्टेंबर रोजी 37.2 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. 1 व 2 ऑक्टोबर रोजीही कमाल तापमान 37.2 अंशांवर कायम राहिले. त्यानंतर 4 ऑक्टोबरला पारा 38.2 अंशांवर, तर 5 व 6 ऑक्टोबर रोजी 38.4 अंशांवर पोहोचला.
सप्टेंबरच्या मध्यातील 28 अंशांच्या तुलनेत सध्या कमाल तापमानात सुमारे 10 अंशांची वाढ झाली आहे. त्यामुळे सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असून, दुपारच्या वेळी उकाड्यात आणखी वाढ होत आहे. दरम्यान, कमाल तापमानाच्या तुलनेत रात्रीच्या तापमानात मोठी घट आहे. 4, 5 व 6 ऑक्टोबर रोजी किमान तापमान 18.6 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. त्यामुळे दिवसा 38 अंशांहून अधिक तापमान, तर रात्री 19 अंशांच्या आसपास किमान तापमान अशी मोठी तफावत निर्माण झाली आहे. पावसाचा अभाव आणि वाढते कमाल तापमान यामुळे शहरातील उष्णतेचा चटका पुन्हा जाणवू लागला आहे.

Mercury at 38.4 degrees in Malegaon.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *