आदिवासी विद्यार्थ्यांचे बारा दिवसांचे उपोषण मागे

लवकरच राजभवनावर मोर्चाचा इशारा

नाशिक : प्रतिनिधी
आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी ईदगाह मैदानावर गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनातील उपोषणकर्त्यांची प्रकृती अत्यंत खालावल्याने अखेर उपोषण मागे घेण्यात आले आहे. मात्र, आंदोलन मागे घेण्यात आलेले नसून ते अधिक तीव्रतेने सुरूच राहणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. उपोषणकर्त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घटनास्थळी भेट देत आंदोलकांना ज्यूस देऊन उपोषणाची सांगता केली.
आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी ईदगाह मैदानावर गेल्या बारा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी उपोषण सुरू केले होते. मात्र, दीर्घकाळ उपोषण केल्याने त्यांची प्रकृती अधिकाधिक खालावत गेल्याने प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेतली.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घटनास्थळी उपस्थित राहून उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांच्या हस्ते आंदोलकांना ज्यूस देण्यात आला आणि उपोषण सोडण्यात आले.
दरम्यान, आंदोलनाला भेट देणारे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे तसेच सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांनीही आंदोलकांना कळकळीची विनंती करत, आंदोलन सुरू ठेवा मात्र, प्रकृतीची काळजी घेऊन उपोषण सोडा, असे आवाहन केले होते. उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले असले तरी आदिवासींच्या मागण्यांसाठीचा लढा कायम राहणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे. उलट आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याची भूमिका त्यांनी घेतली असून, येत्या सात ते आठ दिवसांत थेट राजभवनावर मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Tribal students call off 12-day hunger strike.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *