अग्रलेख

तुकाराम मुंढे पॅटर्न

भारतीय प्रशासन सेवेतील सनदी अधिकारी तुकाराम मुंढे 21 वर्षे प्रशासन सेवेत आहेत. या काळात त्यांची 25 वेळा बदली झालेली आहे. त्यांच्याकडे कोणतीही जबाबदारी दिली, तरी ते नियम आणि कायद्यांवर बोट ठेवून काम करतात.लोकप्रतिनिधी असो की राजकीय व सामाजिक नेते, त्यांना ते कायदे आणि नियम दाखवितात. राजकीय नेत्यांना व लोकप्रतिनिधींना मुंढे यांच्यासारखे कडक शिस्तीचे अधिकारी पेलवत नाहीत. सरकारलाही असे अधिकारी झेलता येत नाहीत. मुंढे यांची सतत बदली होण्याचे हेच कारण असावे. दि. 26 मे 2026 रोजी महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्तपदाचा कार्यभार त्यांनी स्वीकारला. कार्यभार स्वीकारताच त्यांनी नेहमीच्या धडाकेबाज शैलीत अन्नपदार्थांमधील भेसळखोर, बनावट औषध विक्रेते आणि गुटखामाफियांविरोधात धडक मोहीम सुरू केली. राज्यभरात रसायनांचा वापर करून अन्नपदार्थ बनवणार्‍यांवर त्यांनी छापे टाकले. भेसळयुक्त खवा, पनीर आणि बनावट गायीचे तूप यांचे साठे जप्त केले. छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 40 हजार 960 रुपये किमतीचे निकृष्ट दर्जाचे गायीचे तूप जप्त करण्यात आले. पदभार स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवशी पुणे जिल्ह्यातील निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे कृत्रिमरीत्या आंबे पिकवण्यासाठी धोकादायक रसायनांचा वापर करणार्‍यांवर कारवाई करून 800 किलो म्हणजे सुमारे 20 हजार रुपये किमतीचे आंबे जप्त करण्यात आले. मुंबई व कोकण परिसरात अस्वच्छ वातावरणात चालणार्‍या आइस्क्रीम व इतर खाद्य उत्पादन युनिट्सची तपासणी करून ते सील केले. राज्यभरात बंदी असलेला आणि अवैध मार्गाने येणारा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचे मोठे साठे जप्त करून अनेक दुकाने आणि गोदामे सील केली. गुटखा किंवा तंबाखूजन्य पदार्थ असोत की भेसळयुक्त व रासायनिक अन्नपदार्थ असोत, हे सर्व पदार्थ केवळ माणसाच्या आरोग्याशी खेळणारे नाहीत, तर माणसाचा जीव घेणारे आहेत. अन्नपदार्थांत भेसळ करणे, रसायनांचा वापर करणे आणि बनावट पदार्थ तयार करून माणसाच्या जीवनाशी खेळण्याचा स्वार्थी व्यवसाय कोणी करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यकच आहे. शिवाय असे प्रकार कायमस्वरूपी बंद व्हायला पाहिजेत. अशा व्यावसायिकांवर मुंढे यांनी सुरू केलेली कारवाई व छापेमारी स्वागतार्ह आहे. मुंढे यांच्याकडे कोणतीही जबाबदारी दिली, तरी ते लोकांच्या हिताचा विचार करतात आणि बेकायदेशीर व नियमबाह्य प्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न करतात. म्हणून लोकांना त्यांची कार्यपद्धती भावते; परंतु काही हितसंबंधीयांना तेच मुंढे नको असतात. लोकांच्या आरोग्याचा आणि जिवाचा मुंढे विचार करत असतील, तर लोकांचा पाठिंबा त्यांना मिळणारच. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन प्राथमिक गरजा. जगण्यासाठी अन्न ही माणसाची पहिली गरज. माणसाची गरज ओळखून अवाजवी नफा मिळविण्यासाठी काही व्यापारी व व्यावसायिक अन्नात भेसळ करतात, ही काही नवीन गोष्ट नाही. अलीकडच्या काळात रसायनांचा वापर करून बनावटगिरी वाढली आहे आणि माणसाच्या जिवाशी खेळण्याचे प्रकारही वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे नवनियुक्त अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरीविरोधात सुरू केलेली मोहीम देशातील सर्वच प्रशासकीय अधिकार्‍यांसाठी दिशादर्शक ठरेल अशी आहे. तुकाराम मुंढे हे प्रशासनातील कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जातात. आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम भेसळयुक्त अन्नपदार्थांवर लक्ष केंद्रित केले. गेल्या काही दिवसांत मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकांनी राज्यातील अनेक शहरांत व औद्योगिक पट्ट्यांत छापे टाकले. यात कोट्यवधी रुपयांचा भेसळयुक्त माल, बनावट मसाले, निकृष्ट दर्जाचे तेल, दुग्धजन्य पदार्थ, तसेच इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. झटपट नफा कमावण्यासाठी उत्पादक व व्यापार्‍यांचा मालामध्ये भेसळ करण्याकडे अधिक कल असतो. खाद्यपदार्थ हे थेट आरोग्याशी संबंधित असल्याने भेसळयुक्त पदार्थांचे मानवी शरीरावर घातक परिणाम होतात. अनेकदा यातून विषबाधा, कर्करोग, यकृत व मूत्रपिंडाचे विकार यांसह इतर गंभीर आजारांना निमंत्रण मिळण्याचा धोका संभवतो. तरीही केवळ आर्थिक लाभाला चटावलेला वर्ग लोकांच्या आरोग्याशी खेळ करताना दिसतो. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हेच चित्र बघायला मिळते. आपल्या ताटातील अन्न चांगले की वाईट, याची कोणतीही खात्री नसताना निमूटपणे त्याचे सेवन करण्यास लोक प्राधान्य देतात. लोकांच्या या हतबलतेचा व्यापारी मंडळी गैरफायदा घेतात. वर्षानुवर्षे हे दुष्टचक्र चालूच असताना मुंढे यांच्यासारखे अधिकारी या व्यवस्थेविरोधात उभे राहतात, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. भेसळखोरीचे रॅकेट व साखळी मोठी आहे आणि ती तोडण्याचे आव्हानही तितकेच मोठे आहे. गुटखा, निकोटिनयुक्त पानमसाला व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांचे सर्वत्र सर्रास अवैध उत्पादन व विक्री होते. या पार्श्वभूमीवर उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री करणार्‍यांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई करण्याचे आदेश मुंढे यांनी दिले आहेत. गुटखा व तत्सम पदार्थांवर बंदी असूनही छुप्या पद्धतीने व खुलेआम गुटखा विकला जातो. गुटख्याचे भयावह दुष्परिणाम मागच्या काही वर्षांत अनेकांनी अनुभवले आहेत आणि कित्येक कुटुंबे गुटख्यामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. मात्र, प्रशासन व उद्योगातील मंडळींमध्ये मिलिभगत असल्याने मूळ दुखणे कायम आहे. हे दुखणे समूळ नष्ट करण्यासाठी मुंढे यांना ही साखळी तोडावी लागेल. अन्नाइतकीच औषधेही माणसाची महत्त्वाची गरज आहे; परंतु औषधांआडूनही रुग्णांचे व त्यांच्या नातेवाइकांचे प्रचंड शोषण होते. आमच्या रुग्णालयातूनच औषधे घ्या, असा अनेक रुग्णालयांचा अट्टहास असतो आणि त्यांच्याकडून बर्‍याचदा त्याचे बिलही अव्वाच्या सव्वा लावले जाते. उपचार सुरू असल्याने नातलगांना काही बोलता येत नाही; परंतु मुंढे यांनी आता अशा रुग्णालयांनाही आपला हिसका दाखवला आहे. यापुढे रुग्णांना रुग्णालयातूनच औषधे घेणे बंधनकारक राहणार नाही. वैद्यकीय उद्योगातही गेल्या काही वर्षांत अनेक अनिष्ट गोष्टी शिरल्या आहेत. बनावट वा धोकादायक औषधांची विक्री हा त्याचाच भाग आहे. ऑनलाइन औषधपुरवठा आणि त्यातील सुरक्षिततेचा मुद्दाही अलीकडे चर्चेत आहे. एकूणच हा सगळा संवेदनशील विषय असल्याने भविष्यात या पातळीवरही काम करावे लागेल. प्रशासनात आजही तुकाराम मुंढे यांच्यासारखे प्रामाणिक अधिकारी काम करतात, ही सामान्य माणसांसाठी अतिशय सुखावह बाब आहे. राज्यातील व देशातील अनेक विभाग लकवाग्रस्त असल्यासारखी स्थिती आहे. त्यांना हलवण्यासाठी ’मुंढे पॅटर्न’शिवाय पर्याय नाही.

Tukaram Mundhe Pattern

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अशांत बलुचिस्तान

पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…

8 hours ago

राजकीय संवेदनशीलता

- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…

8 hours ago

अंतराळ कचर्‍याचे वाढते संकट : पृथ्वीच्या भवितव्याला नवे आव्हान

एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…

8 hours ago

दिलासा!

प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय असल्याने देशात यंदा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असताना जून महिना…

8 hours ago

संततधार पावसाने नंदिनी नदीला पूर

सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…

8 hours ago

पोलिसांसाठी मंत्री महाजन ठरले ‘संकटमोचक’

चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…

8 hours ago