पुण्याला जाण्यापूर्वी दोन बांगलादेशी ताब्यात

भारतात अनधिकृत प्रवेश

सिडको : प्रतिनिधी
भारत-बांगलादेश सीमेवरून कोणतीही वैध परवानगी अथवा प्रवासी कागदपत्रे नसताना भारतात प्रवेश करून नाशिकमार्गे पुण्याला जाण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणासह तरुणीला गुन्हे शाखेच्या युनिट-2 ने नाशिकरोड बसस्थानकातून ताब्यात घेतले. मोहम्मद साकीब मुल्ला (वय 22) आणि नाहिदा बादशाह मुल्ला (वय 21) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही बांगलादेशातील खुलना राज्यातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट-2चे पथक अनधिकृतपणे भारतात वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांची माहिती घेत असताना पोलिस हवालदार प्रदीप नन्नावरे आणि पोलिस अंमलदार संतोष सुपेकर यांना गुप्त माहिती मिळाली. एक बांगलादेशी तरुण आणि तरुणी नाशिकरोड बसस्थानकातून पुण्याला जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ अधिकार्‍यांना कळविण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी नाशिकरोड बसस्थानकातील पोलिस चौकीजवळ सापळा रचला. त्यावेळी मोहम्मद साकीब मुल्ला (वय 22, मूळ रा. खुलता, जिल्हा नराईल, खुलना, बांगलादेश) आणि नाहिदा बादशाह मुल्ला (वय 21, रा. सगोलसिरा, जिल्हा नराईल, खुलना, बांगलादेश) हे दोघे आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता कोणतेही वैध प्रवासी कागदपत्र आढळले नाही.
पोलिसांच्या चौकशीत दोघांनी भारत-बांगलादेश सीमेवरील अधिकार्‍यांची लेखी परवानगी न घेता अनधिकृत मार्गाने भारतात प्रवेश केल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिस अंमलदार संतोष सुपेकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्यानंतर नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नाशिकरोड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक आहेर करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत, सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप गिरी, गुन्हे शाखा युनिट-2चे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, सहायक पोलिस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलिस हवालदार प्रदीप नन्नावरे, पोलिस अंमलदार संतोष सुपेकर, मनोज शिंदे, प्रवीण वानखेडे, जितेंद्र वजिरे तसेच नाशिकरोड दामिनी पथकातील सोनाली बागूल आणि ज्योती पवार यांच्या पथकाने केली.

Two Bangladeshis detained before heading to Pune.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *