डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप, पोलीस ठाण्यात चौकशी सुरू
मनमाड : प्रतिनिधी
मनमाड शहरातील देवकी हॉस्पिटलमध्ये दोन दिवसांच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टरांच्या आणि हॉस्पिटल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच बाळाचा जीव गेल्याचा गंभीर आरोप संतप्त पालकांनी केला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, हे प्रकरण आता पोलीस ठाण्यात पोहोचले आहे. उपविभागीय पोलीस अधीक्षक बाजीराव महाजन यांनी घटनेची सर्व माहिती घेतली. याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.
बाळाच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाची प्रकृती खालावल्यानंतर आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाला याबाबत विचारणा केली. मात्र, सुरुवातीला हॉस्पिटल प्रशासनाकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. डॉक्टरांनी नक्की काय उपचार केले, बाळाला कोणते औषधोपचार देण्यात आले, याची कोणतीही स्पष्ट माहिती पालकांना देण्यात आली नाही. हॉस्पिटलमध्ये नेमके काय घडले हे शोधण्यासाठी पालकांनी प्रशासनाकडे सीसीटीव्ही
फुटेज दाखवण्याची आणि ते देण्याची मागणी केली. मात्र, हॉस्पिटलकडून सहकार्य मिळत नसल्याने आणि बाळाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संतप्त पालकांनी व नातेवाइकांनी थेट मनमाड शहर पोलीस ठाणे गाठले. मनमाड शहर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, घटनेबाबत सखोल चौकशी सुरू केली आहे.
हलगर्जीपणामुळेच बाळाचा मृत्यू!
माझ्या पत्नीची डिलिव्हरी केली हे सत्य आहे. मात्र, त्यानंतर बाळाला ज्या पद्धतीने उपचार करायला हवे होते ते केले नाहीत. याशिवाय, एनआयसीयूमध्ये निवासी एमडी डॉक्टर असणे अपेक्षित आहे. मात्र, देवकी हॉस्पिटलमध्ये सर्व कारभार हा नर्सच्या भरवशावर चालतो. आमच्या बाळाचा मृत्यूला हॉस्पिटलचा हलगर्जीपणाच कारणीभूत आहे. चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
– मोईन तांबोळी, पालक
आमच्या परीने सर्व प्रयत्न केले : डॉ. राजपूत
रविवारी वादळी वार्यासह पाऊस सुरू होता. तरीही आम्ही क्रिटिकल अवस्थेत डिलिव्हरी करून बाळाला एनआयसीयूमध्ये शिफ्ट करून नॉर्मल केले. याशिवाय, आम्हाला जे जे करता येईल ते करून बाळ स्टेबल केले. याशिवाय, आम्ही घटनेनंतर पालकांना सर्व मदत केली. मात्र, आम्ही बाळाला वाचवू शकलो नाही, याचे वाईट वाटते. कोणत्याही डॉक्टरला त्याचे पेशंट मरायला हवे, असे वाटत नाही, असे डॉ. रवींद्र राजपूत यांनी सांगितले.
Two-day-old baby dies in Manmad.