संतोष शर्माविरुद्ध आणखी दोन गुन्हे

सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिकमध्ये खंडणीखोरीसाठी कुख्यात असलेल्या संतोष शर्मा आणि त्याच्या टोळीविरुद्ध आणखी दोन नवीन गुन्हे दाखल झाले आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत दोन वेगवेगळ्या उद्योजकांकडून धमकी देत खंडणी उकळल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. अंबड पोलीस ठाण्यात दोन्ही गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

पहिल्या प्रकरणात उद्योजक शैलेश रूपचंद नारखेडे (वय 51, रा. गंगापूर रोड) यांच्या मालकीच्या अंबड एमआयडीसीतील कंपनीत कच्चा माल ठेवण्यासाठी केलेल्या बांधकामाचे फोटो व व्हिडीओ संतोष शर्मा व त्याच्या साथीदारांनी गुप्तपणे काढले. त्यानंतर एमआयडीसी कार्यालयात नारखेडे यांच्या विरोधात खोटी तक्रार दाखल करून ती मागे घेण्यासाठी तीन लाख 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. पैसे देण्यास नकार दिल्यावर 9 नोव्हेंबर रोजी कंपनीच्या गेटवर येऊन धमकी देत जिवे मारण्याची भीती दाखवली. शेवटी दबावाखाली नारखेडे यांच्याकडून एक लाख 60 हजार रुपये स्वीकारल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी संतोष शर्मा, शशी राजपूत, रोहित म्हस्के आणि कैलास दवंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुगले करत आहेत.
दुसर्‍या घटनेत माजी नगरसेविका योगिता धनंजय आहेर (वय 55, रा. आनंदवली) यांच्या कंपनीतील बांधकामाचा मुद्दा काढून त्यांच्याकडूनही खंडणी उकळण्यात आली. आहेर यांच्या कंपनीतील बांधकामाचे फोटो आणि व्हिडीओ काढून खोटी तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार मागे घेण्यासाठी तीन लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्याने 6 नोव्हेंबर रोजी आहेर यांच्या कंपनीच्या गेटवर मॅनेजर भगवान सोनवणे यांना शिवीगाळ करून हातपाय तोडण्याची तसेच ठार मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर संतोष शर्माने फोनवरून धमकी देत 90 हजार रुपये स्वीकारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणातही संतोष शर्मा आणि त्याचे साथीदार शशी राजपूत, रोहित म्हस्के व कैलास दवंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक शेवाळे तपास करत आहेत.
संतोष शर्मा व त्याच्या टोळीने बांधकामासंदर्भातील तक्रारींचा गैरवापर करून खंडणी उकळण्याचे दोन्ही प्रकार समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *