विंचूर : प्रतिनिधी
विंचूरपासून जवळच असलेल्या विष्णूनगर येथील म्हसोबा माथा परिसरात मंगळवारी (दि.9) मध्यरात्री दीडच्या सुमारास मक्याच्या भुसापासून गट्टू तयार करणार्या कंपनीला आग लागली. त्यात तीन ते चार लाखांचेे नुकसान झाले.
पहाटे पाचच्या दरम्यान परिसरातील नागरिकांना कंपनीच्या दिशेने प्रचंड धूर निघत असल्याचे दिसल्याने ही घटना उघडकीस आली. नागरिकांनी तत्काळ कंपनी व्यवस्थापकांंना फोन करून माहिती दिली. त्यानंतर व्यवस्थापकांनी कंपनीमालक डॉ. सचिन जेऊघाले यांच्याशी संपर्क साधला.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. जेऊघाले यांनी त्वरित अग्निशमन दलाशी संपर्क साधला.त्यानंतर चांदवड व निफाड येथील दोन अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रित आणली. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग इतर यंत्रसामग्री व परिसरात न पसरता आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या घटनेत कंपनीमध्ये साठवून ठेवलेला 70 ते 80 टन मक्याचा भुसा जळून खाक झाला. प्राथमिक अंदाजानुसार तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.