खड्डे, चिखलामुळे अपघात झाल्याचा नागरिकांचा दावा
सिडको : प्रतिनिधी
सातपूर औद्योगिक वसाहतीतील निलय इंडस्ट्रीज येथील हनुमान मंदिरासमोर मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात 43 वर्षीय सुजित राजेंद्र गायकवाड यांचा मृत्यू झाला. दुचाकीवरून जात असताना त्यांची दुचाकी पुढील चारचाकी वाहनाला धडकली. त्यानंतर ते रस्त्यावर कोसळले आणि विरुद्ध दिशेने येणार्या छोटा हत्ती वाहनाच्या चाकाखाली आल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.
सुजित गायकवाड हे राहुल नगर, पवारवाडी, जेलरोड, नाशिकरोड येथील रहिवासी होते. मंगळवारी सकाळी सुमारे 11 वाजता ते दुचाकीवरून सातपूर औद्योगिक परिसरातून निलय इंडस्ट्रीजच्या दिशेने जात होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमान मंदिरासमोरील रस्त्यावर खड्डे आणि चिखलामुळे वाहनचालकांना अडचणी येत होत्या. गायकवाड यांच्या पुढे जाणार्या चारचाकी वाहनाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे मागून येणार्या गायकवाड यांना दुचाकीवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि त्यांची दुचाकी चारचाकीला धडकली.
धडकेनंतर गायकवाड दुचाकीसह रस्त्यावर कोसळले. त्याचवेळी समोरून येणार्या छोटा हत्ती वाहनाच्या पुढील चाकाखाली ते आले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या गायकवाड यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
या अपघाताची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. अवघ्या काही सेकंदांत अपघाताची संपूर्ण घटना घडल्याचे चित्रणात दिसून येते. पुढील वाहनाने अचानक ब्रेक लावणे, त्यानंतर दुचाकीची चारचाकीला धडक होणे, गायकवाड रस्त्यावर कोसळणे आणि समोरून येणार्या छोटा हत्ती वाहनाच्या चाकाखाली येणे, अशी घटना सीसीटीव्हीत दिसत असल्याचे सांगण्यात आले.
गायकवाड यांच्या पश्चात पत्नी आणि 12 वर्षांची मुलगी आहे. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या अपघातानंतर सातपूर औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. परिसरातील अनेक रस्त्यांवर खड्डे आणि चिखल असून, त्यातून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, खड्डे बुजवावेत तसेच चिखलाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी अद्याप अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सुजित गायकवाड यांचा मृत्यू हा सातपूर परिसरातील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातातील नववा बळी असल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येत आहे. या दाव्याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध होणे आवश्यक आहे.दरम्यान, या अपघातामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, प्रशासनाने सातपूर औद्योगिक परिसरातील रस्त्यांची तातडीने पाहणी करून खड्डे आणि चिखलाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे.
Two-wheeler rider dies in accident at Satpur
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…