दुचाकी चोरीचा पर्दाफाश; सराईत चोर अटकेत

90 हजार रुपये किमतीच्या तीन चोरीच्या दुचाकी जप्त

मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव शहरातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कॅम्प पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने प्रभावी कारवाई करत एका सराईत दुचाकी चोराला अटक केली. आरोपीकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त केल्या असून, त्यांची एकूण किंमत सुमारे 90 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज निकम यांना काळी कुट्टी परिसरात एक व्यक्ती चोरीची दुचाकी विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने सापळा रचून निसार अहमद पिरन शाह (वय 30, रा. संजरीनगर, बाबू हॉटेलजवळ, रमजानपुरा, मालेगाव) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या स्प्लेंडर प्लस दुचाकीबाबत चौकशी केली असता, त्याने सुरुवातीला समाधानकारक माहिती दिली नाही. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर संबंधित दुचाकी चोरीची असल्याची कबुली त्याने दिली. आरोपीला न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कोठडी घेण्यात आली. कोठडीदरम्यान केलेल्या चौकशीत त्याने आणखी दोन दुचाकी चोरी करून विक्रीसाठी ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार, पोलिसांनी कारवाई करत एकूण तीन चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई कॅम्प उपविभागाचे अतिरिक्त कार्यभार असलेले सिद्धार्थ बारवाल आणि प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज निकम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक राऊत तसेच पोलीस अंमलदार सुनील भामरे, सचिन गोसावी, हितेश भामरे, दीपक हंबाडे, लखन पवार आणि कैलास सोनवणे यांनी सहभाग घेतला.

Two-wheeler theft racket busted; habitual thief arrested.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *