दिंडोरी : प्रतिनिधी
तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्तीवर चोराने घरफोडी करून घरातील रोकडसह सोन्याचे दागिने असा
एक लाख 25 हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी बबन संपत डमाळे (वय 36, रा. डमाळे वस्ती, वनारवाडी) हे कुटुंबासह राहत्या घरी झोपलेले असताना ही घटना घडली. 5 ऑगस्टच्या रात्री 11 ते 6 ऑगस्टच्या सकाळी 5.45 वाजेच्या दरम्यान चोराने घराच्या सिमेंटच्या पत्र्याचे हूक खोलून आत प्रवेश केला. त्यानंतर चोराने घरातील कपाटात ठेवलेली 25 हजारांची रोख रक्कम (500 रुपयांच्या नोटा) आणि 1 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने (1.5 तोळ्याचा नेकलेस, 1.5 तोळ्याची पोत आणि 1 तोळ्याचे कानातील कुडके) असा एकूण 1 लाख 25 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर बबन डमाळे यांनी 6 ऑगस्टला दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पुरावे गोळा करण्यासाठी डॉग स्क्वॉड (श्वानपथक) आणि फिंगरप्रिंट (ठसेतज्ज्ञ) पथकाला पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी दिंडोरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता विविध अन्वये संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला. दिंडोरी पोलीस तपास करीत आहेत.
Property worth ₹1.25 lakh stolen in Vanarwadi settlement burglary