कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर; यंत्रणांचे सोयीस्कर दुर्लक्ष
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असल्याने त्र्यंबकेश्वर शहर आणि परिसरात अनिर्बंध व्यावसायिक बांधकामांना ऊत आला आहे. कमाईच्या लोभापोटी नियमबाह्य पद्धतीने लॉजिंग व्यवसायासाठी खोल्या बांधण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. यात साधू आखाडेही मागे नाहीत. मात्र, या अनिर्बंध
बांधकामांमुळे भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
स्थानिक प्रशासन दिल्ली येथील भीषण आग दुर्घटनेपासून काही बोध घेणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
सध्या त्र्यंबकेश्वरमध्ये दोन हजार निवासी खोल्या तयार आहेत. आणखी तीन हजार खोल्यांचे काम वेगाने सुरू आहे.
हे लॉजिंग उभारताना नगररचना, पोलीस, स्थानिक प्रशासन, सार्वजनिक बांधकाम आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोणत्याही नियमांचे पालन केले जात नसल्याचे चित्र आहे. आणीबाणीच्या प्रसंगी बाहेर पडण्याचा मार्ग, अग्निशमन यंत्रणा आणि पुरेशी खेळती हवा यांसारख्या आवश्यक निकषांना केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष
कुंभनगरीच्या विकासासाठी आणि कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी सरकार कोट्यवधींचा निधी देत आहे. मात्र, केवळ आर्थिक फायद्यासाठी उभारल्या जाणार्या या धोकादायक इमारतींकडे शासकीय यंत्रणांनी सोयीस्कर डोळेझाक केली आहे. भविष्यातील मोठी दुर्घटना टाळण्यासाठी या अनिर्बंध लॉजिंग व्यवसायाची तातडीने तपासणी करण्याची मागणी जागरूक नागरिकांमधून होत आहे.
अधिकृत नोंदणीला फाटा
त्र्यंबक नगरपरिषदेकडे अधिकृत नोंदणी असलेल्या लॉजिंगची संख्या अत्यंत अल्प आहे. कर वाचवण्यासाठी बहुतांश इमारतींची नोंदणीच केली जात नसल्याने नगर परिषदेच्या उत्पन्नात कोणतीही वाढ झालेली नाही.
वाहनतळाचा अभाव
अनेक लॉजिंगमध्ये पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे भाविकांची वाहने रस्त्यावर उभी केली जातात. परिणामी, शहरात दररोज मोठी वाहतूक कोंडी होत असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पार्किंगच्या वादातून रोज हाणामारीचे प्रकार घडत आहेत.
Unrestricted lodging construction accelerates in Trimbakeshwar