बाजारात गावरान कैर्यांची धूम, महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले
दिंडोरी : प्रतिनिधी
पहिल्या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. ग्रामीण भागासह शहरांत वर्षभर पुरेल असे चटकदार कैरीचे लोणचे बनविण्याची लगबग सुरू झाली आहे. घरोघरी लोणच्याच्या तयारीला गृहिणींनी वेग दिला आहे. बाजारात गावरान कैरी
खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. लोणचे तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या कडक, ताज्या व आंबट गावरान कैर्यांना सध्या विशेष मागणी आहे.
यंदा कैर्यांचे दर तुलनेने स्थिर असून, बाजारात कैरी 25 ते 30 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध होत आहे. मात्र, वाढत्या महागाईचा परिणाम लोणच्यासाठी लागणार्या मसाल्यांवर दिसून येत आहे. लाल तिखट, मोहरी डाळ, मेथी, हळद, हिंग, तसेच खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्याने गृहिणींचे बजेट काहीसे कोलमडले आहे.
बाजारात अनेक महिला कैरी जागेवरच फोडून घेण्यास प्राधान्य देत आहेत. यासाठी विक्रेत्यांकडून प्रतिकिलो अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे घरातील मेहनत कमी होत आहे. लोणचे तयार करण्याचे काम अधिक सोयीस्कर होत असल्याचे महिलांनी सांगितले.
वर्षभर टिकणारे आणि पारंपरिक चवीचे अस्सल गावरान लोणचे तयार करण्यावर भर दिला जात आहे. ग्रामीण भागातील महिलांमध्ये पारंपरिक खाद्यसंस्कृती जपण्याची ही परंपरा आजही कायम असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे.
पहिला पाऊस पडला की, घरात लोणच्याच्या तयारीला सुरुवात होते. यंदा कैर्यांचे दर परवडणारे आहेत. त्यामुळे वर्षभर पुरेल इतके लोणचे तयार करण्याचा मानस आहे. मसाल्यांचे दर वाढले असले तरी घरच्या घरी बनवलेल्या गावरान लोणच्याची चव आणि टिकाऊपणा वेगळाच असतो.
– ललिता गांगोडे, गृहिणी, वारेपारंपरिक पद्धतीने बनवलेले कैरीचे लोणचे हे प्रत्येक घराचा अविभाज्य भाग आहे. तयार मसाले वापरण्यापेक्षा स्वतः मसाला तयार करून लोणचे बनवण्यावर आम्ही भर देतो. पहिल्या पावसाच्या सरींसोबतच कैरीच्या लोणच्याचा दरवळ बाजारपेठांमध्ये पसरला आहे.
– शीतल राहाणे, गृहिणी
With the onset of rain, there is a rush to make pickles at home.