भूसंपादनाचा तिढा सुटेपर्यंत किमान डागडुजी करा
सिन्नर : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात येत असलेल्या राज्यमार्ग क्रमांक 37 च्या भूसंपादन मोबदल्याचा प्रश्न अद्याप निकाली न निघाल्याने नवीन मार्गाचे काम रखडले आहे. त्याचा फटका वडगाव पिंगळा, चिंचोली या जुन्या मार्गाचा वापर करणार्या नागरिकांना बसत असून, दुरुस्तीअभावी संपूर्ण रस्ता मोठमोठ्या खड्ड्यांनी व्यापला आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि परिसरातील गावांतील नागरिकांचा प्रवास धोकादायक बनला आहे.
राज्यमार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने किमान तात्पुरती डागडुजी करून खड्डे बुजवावेत, अन्यथा नाशिक-पुणे महामार्गावरील चिंचोली फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वडगाव पिंगळा ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रियंका हुळहुळे, सामाजिक कार्यकर्ते अजय हुळहुळे तसेच ग्रामस्थांनी दिला आहे.
या मार्गावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून काही ठिकाणी त्यांची खोली अर्धा फूटपर्यंत पोहोचली आहे. परिणामी वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून अपघातांचे प्रमाणही वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
Vadgaon-Pingla-Chincholi road riddled with potholes.