पृथ्वीपासून एक प्रकाश-दिन दूर पोहोचलेले पहिले मानवनिर्मित यान
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अवकाश संशोधनाच्या इतिहासात नासाच्या व्हॉयेजर-1 या अंतराळयानाने आणखी एक सुवर्णपान लिहिले आहे. तब्बल 49 वर्षांच्या प्रवासानंतर बुधवारी (दि. 18) हे यान पृथ्वीपासून एक प्रकाश-दिन म्हणजेच सुमारे 2,600 कोटी किलोमीटर अंतरावर पोहोचले. एवढ्या दूरवर पोहोचणारी ही मानवाने बनवलेली पहिलीच वस्तू ठरली आहे. आता पृथ्वीवरून पाठवलेला रेडिओ संदेश या यानापर्यंत पोहोचण्यासाठी 24 तास, तर त्याचे उत्तर पृथ्वीवर येण्यासाठी आणखी 24 तास लागणार आहेत. म्हणजेच पृथ्वीवरून केलेल्या ‘हॅलो’ला उत्तर मिळण्यासाठी तब्बल दोन दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल! अमेरिकन पूर्व प्रमाणवेळेनुसार बुधवारी सकाळी 5 वाजून 16 मिनिटांनी व्हॉयेजर-1 ने हा ऐतिहासिक टप्पा गाठला. एक प्रकाश-दिन म्हणजे प्रकाशाने 24 तासांत पार केलेले अंतर. 5 सप्टेंबर 1977 रोजी केप कॅनव्हेरल येथून प्रक्षेपित करण्यात आलेल्या या यानाची मूळ मोहीम गुरू आणि शनी ग्रहांच्या अभ्यासापुरती मर्यादित होती. मात्र, 1979 मध्ये गुरू आणि 1980 मध्ये शनी ग्रहाजवळून प्रवास करताना त्यांच्या गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करून यानाने आपला वेग वाढवला. सध्या ते ताशी सुमारे 61 हजार किलोमीटर वेगाने अंतराळात प्रवास करत आहे. 1998 मध्ये पायोनियर-10 यानाला मागे टाकून व्हॉयेजर-1 सर्वांत दूर पोहोचलेली मानवनिर्मित वस्तू ठरले. ऑगस्ट 2012 मध्ये सूर्याच्या प्रभावक्षेत्राची सीमा ओलांडून आंतरतारकीय अवकाशात प्रवेश करणारे ते पहिले यान बनले. विशेष म्हणजे, या यानासोबत पृथ्वीवरील मानवी संस्कृतीचा परिचय करून देणारी ‘गोल्डन रेकॉर्ड’ ही ध्वनिमुद्रिका पाठवण्यात आली आहे. त्यामध्ये 55 भाषांतील शुभेच्छा, पृथ्वीवरील विविध आवाज, संगीत आणि छायाचित्रांचा समावेश आहे.
‘Voyager-1’ makes history; a journey of 26 billion km over 49 years!