सिटी सेंटर मॉलजवळ प्रकार एफडीएकडे तक्रार
नाशिक : विशेष प्रतिनिधी
शहर स्वच्छतेचे व पर्यावरण संवर्धनाचे दावे केले जात असतानाच, नाशिक शहरातील नंदिनी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कालबाह्य झालेली औषधे आणि टॅब्लेट फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सिटी सेंटर मॉलच्या पाठीमागे असलेल्या महालक्ष्मी देवी मंदिराच्या परिसरात हा प्रकार घडला असून, यामुळे नदीचे प्रदूषण तर वाढले आहेच, शिवाय परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.
असा उघडकीस आला प्रकार
नेहमीप्रमाणे सकाळी नंदिनी नदी परिसरात फेरफटका मारण्यासाठी गेलेले पर्यावरणप्रेमी चंद्रकिशोर पाटील यांच्या ही बाब लक्षात आली. नदीच्या किनारी आणि पात्रात औषधांच्या बाटल्या व टॅब्लेटचे मोठे साठे तरंगताना व साचलेले दिसले. त्यांनी तातडीने पुढाकार घेत हे औषधांचे साठे नदीपात्रातून बाहेर काढले.
फेकलेल्या औषधांच्या कचर्यामध्ये काही कागदपत्रे आणि पत्याचे पुरावे देखील आढळून आले आहेत. त्यामुळे ही औषधे कोणी फेकून दिली, याचा सुगावा लागणे सहज शक्य झाले आहे. निष्काळजीपणे औषधे नदीत टाकून जलप्रदूषण करणार्या असामाजिक तत्त्वांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईचे आश्वासन
पर्यावरणप्रेमी चंद्रकिशोर पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती तात्काळ अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली आहे. या घटनेची गंभीर दखल नाशिक विभागाचे सह-आयुक्त श्री. देशमुख यांनी घेतली असून, मिळालेल्या कागदपत्रांच्या व पत्यांच्या आधारे संबंधित दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
“नदीमध्ये अशा प्रकारे रसायने व कालबाह्य औषधे टाकणे अत्यंत धोकादायक आहे. औषधांसोबत सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे एफडीए नक्कीच दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल, अशी अपेक्षा आहे.“
– चंद्रकिशोर पाटील, (पर्यावरणप्रेमी)
Waste of expired medicines in Nandini river basin