सुपर 100 चा पॅटर्न राज्यभर राबविणार : ना. दादा भुसे

प्रत्येक जिल्ह्यात आनंद क्रीडा प्रबोधिनी

नाशिक : प्रतिनिधी
शिक्षणाचा दर्जा उंचावण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुपर 100चा पॅटर्न राज्यभर राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. प्रत्येक जिल्ह्यात आनंद क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्यात येणार असून, अटल क्रीडा स्पर्धा शाळास्तरापासून केंद्र, तालुका आणि राज्यस्तरापर्यंत घेण्यात येतील. आनंदी शनिवार सोबत आता माहितीचा शनिवार हा उपक्रमही राबविण्यात येणार आहे.
शिक्षण क्षेत्राच्या राज्य व देशव्यापी मूल्यांकनात मागील वर्षी कोल्हापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर होता. महाराष्ट्रानेही मूल्यांकनातील विविध निर्देशांकांमध्ये अपेक्षित कामगिरी करण्यासाठी संबंधित बिंदूंवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. यासाठी राज्यव्यापी बैठक घेऊन शाळांमधील कमतरता दूर करण्याबाबत चर्चा करण्यात आली. नाशिकचा निर्देशांक सध्या 0.80 असल्याचे सांगून, विद्यार्थ्यांना वाचन, लेखन व गणितातील मूलभूत कौशल्ये आत्मसात झाली आहेत का, यावर विशेष भर देण्याची गरज भुसे यांनी व्यक्त केली.
शाळांमध्ये पाणी, स्वच्छतागृहे, इमारतींची दुरुस्ती, ग्रंथालय, प्रयोगशाळा, ई-सुविधा, क्रीडांगणे व संरक्षक भिंती यांसारख्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. सुरगाणा तालुक्यातील वाहुची वाडी येथील शाळेसाठी निधी देण्याचेही भुसे यांनी जाहीर केले.
शिक्षक भरती प्रक्रियेत पटसंख्येच्या आधारे शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असून, पुढील दोन महिन्यांत ही प्रक्रिया करण्याचे नियोजन आहे. कला व क्रीडा शिक्षकांची उपलब्धताही वाढविण्यात येणार आहे. विद्यार्थिनींसाठी पिंक वर्ग आणि सायकल योजनेचा लाभ थेट लाभ हस्तांतरणाच्या (डीबीटी) माध्यमातून देण्याचे नियोजन आहे. शाळेपासून एक किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरून येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी प्रवास निधी देण्याचाही निर्णय प्रस्तावित आहे.
शाळांच्या आवारात शालेय साहित्याशी संबंधित बाबी वगळता इतर कोणत्याही टपर्‍या असू नयेत, तसेच नशामुक्तीसाठी कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय पूर्वीच्या 14 समित्यांऐवजी आता चार समित्या ठेवण्यात आल्या असून, आवश्यक माहिती केवळ शनिवारी मागविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पवित्र पोर्टलवरील नोंदणीसाठी मुदत 13 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली असून, आतापर्यंत एक लाखांहून अधिक नोंदणी झाल्याची माहिती भुसे यांनी दिली.
कुंभमेळा कामांमध्ये बनावट आदेशाद्वारे कामे झाल्याचे आढळल्यास हा प्रकार गंभीर असून, दोषींवर चौकशी करून कारवाई केली जाईल, असा इशाराही भुसे यांनी दिला. पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीबाबत मात्र त्यांनी भाष्य करणे टाळले.

माहितीचा शनिवार मुळे शिक्षकांना दिलासा
पूर्वी 14 समित्यांमार्फत विविध माहिती मागविली जात होती. आता समित्यांची संख्या चार करण्यात आली आहे. शाळांकडून आवश्यक माहिती केवळ शनिवारी मागविण्याच्या निर्णयामुळे शिक्षकांवरील प्रशासकीय कामाचा ताण कमी करण्याचा प्रयत्न आहे. शिक्षकांची जबाबदारी विभाग घेणार असून, इतर विभागांनीही त्यांच्या कामाची जबाबदारी स्वीकारावी, अशी अपेक्षा भुसे यांनी व्यक्त केली.

सुपर 100 सोबत क्रीडा, कौशल्यविकासावर भर
प्रत्येक जिल्ह्यात आनंद क्रीडा प्रबोधिनी सुरू करून विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात संधी देण्यात येणार आहे. अटल क्रीडा स्पर्धा शाळास्तरापासून केंद्र, तालुका आणि राज्यस्तरापर्यंत घेण्यात येतील. विद्यार्थिनींसाठी पिंक वर्ग, सायकल डीबीटी, शैक्षणिक सहली आणि शाळेपासून दूर राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी प्रवास निधी अशा उपाययोजनांमधून शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येणार आहे.

 

‘Super 100’ pattern to be implemented across the state: Minister Dada Bhuse

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *