16 ऑक्टोबरपासून 10 टक्के पाणीकपात
नाशिक : प्रतिनिधी
यंदा नाशिकच्या गंगापूर धरणात मुबलक पाणीसाठा असला, तरी अल निनोमुळे राज्यात सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती आहे. भविष्यात पाणीटंचाई उद्भवू नये याकरिता राज्य शासनाने पाण्याचे धरणनिहाय आणि वापरनिहाय नियोजन केले आहे. त्याचमुळे येत्या 16 ऑक्टोबरपासून किमान 10 टक्के पाणी कपातीचे निर्देश लागू केल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. त्यामुळे नाशिकमध्ये 10 टक्के पाणीकपात झाल्यास 610 दशलक्ष लिटरपैकी 550 दशलक्ष लिटर एवढेच पाणी मिळणार असल्याने नाशिककरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.
मागील दोन वर्षे महापालिकेने जलसंपदाकडे वाढीव पाण्याची मागणी केली नसल्याने यंदा महापालिकेने जलसंपदाकडे 6800 दशलक्ष लिटर पाण्याची मागणी केली आहे. परंतु यंदा महापालिकेला आपल्याच केल्या जाणार्या पाणीपुरवठ्यात कपात करावी लागणार आहे. जलसंपदा विभागाने 31 ऑगस्ट 2027 पर्यंतच्या पाण्याचे धरणनिहाय आणि वापरनिहाय सूक्ष्म नियोजन केले आहे. राज्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर 16 ऑक्टोबर 2026 पासून सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किमान 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गंगापूर धरणातील उपलब्ध जलसाठा पुढील वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत पुरवून वापरण्याचे मोठे आव्हान जलसंपदा विभागासमोर आहे. वातावरणातील तापमान वाढल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने होण्याची भीती आहे. दरम्यान, यंदा पावसाने नाशिकमध्ये जूनमध्ये दांडी मारल्याने महापालिका प्रशासनाने प्रत्येक आठवड्यात एक दिवस पाणी कपातीची निर्णय घेतला होता. परंतु जुलै व ऑगस्टमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे गंगापूरसह दारणा, कश्यपी व इतर धरणे भरल्यानंतर पाणी कपातीची निर्णय मागे घेण्यात आला होता. मात्र, आता अलनिनोमुळे भविष्यातील पाणीटंचाई टाळ्ण्यासाठी दहा टक्के पाणीकपात केली जाणार आहे.
सिंहस्थात एक टीएमसीची आवश्यकता
सिंहस्थात कोट्यवधी भाविक शहरात दाखल होणार असल्याने महापालिका प्रशासनाने सिंहस्थासाठी एक टीएमसी पाण्याचे नियोजन केले आहे. सिंहस्थात तब्बल 7900 दशलक्ष लिटर पाणी पुरवण्याचे नियोजन आहे. याबाबतचे पत्र ऑगस्टमध्येच जलसंपदाला महापालिकेने पाठविले आहे. मात्र, सध्याची स्थिती पाहता सिंहस्थात पाण्याचे नियोजन करताना प्रशासनाची मोठी कसरत होणार आहे.
Water cut crisis looms over Nashik residents.