जलआरक्षणात 1,350 एमसीएफटीची तूट
नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि उपलब्ध पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या पाणीपुरवठ्याचे ऑगस्ट 2027 पर्यंत काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. पाण्याची उपलब्धता अपुरी पडल्यास शहरात पाणीकपात लागू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्याने दिवाळीनंतर नाशिककरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. पाण्याच्या उपलब्धतेचा आढावा घेतल्यानंतर कपातीचा निर्णय घेतला जाईल, असे महापौर हिमगौरी आडके यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि. 29) ना. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पाणी नियोजनाची बैठक झाली. यावेळी महापौर हिमगौरी आडके, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आणि जलसंपदा विभागाच्या सोनल शहाणे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. पाण्याची उपलब्धता, शहराची गरज, बाष्पीभवन आणि सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी लागणारे अतिरिक्त पाणी या सर्व बाबींचा विचार करून नियोजन करण्याचे निर्देश महाजन यांनी दिले. पाणीगळती रोखण्याबरोबरच रस्त्यांच्या कामांसाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
सन 2026-27 या वर्षासाठी महापालिकेने 7,667 दशलक्ष घनफूट (एमसीएफटी) पाण्याची मागणी केली असताना जलसंपदा विभागाने 6,317 एमसीएफटी पाण्यालाच मंजुरी दिली आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत 1,350 एमसीएफटी पाणी कमी मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीनंतर शहरात 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचे नियोजन महापालिकेने केले असून, उपलब्ध जलसाठा ऑगस्ट 2027 पर्यंत पुरविण्याची कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे. दुसरीकडे, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 635 एमसीएफटी पाण्याचे स्वतंत्र आरक्षण मंजूर करण्यात आले आहे. दिवाळीनंतर पाण्याच्या उपलब्धतेचा आढावा घेऊन एक दिवसाआड पाणीपुरवठा करायचा की आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करायची, याचा निर्णय घेतला जाणार आहे. अद्याप कपातीचे अंतिम वेळापत्रक जाहीर झालेले नसले, तरी उपलब्ध साठ्याचा विचार करता पाणीकपातीची शक्यता वाढली आहे.
अतिरिक्त पाणी मागणीचा प्रस्ताव नामंजूर
मनपाने जलसंपदा विभागाकडे अतिरिक्त 45 दलघफू पाण्याची मागणी केली होती. मात्र, अतिरिक्त पाणी देण्यास जलसंपदा विभागाने नकार
दिला आहे.
सिंहस्थासाठी 635 ‘एमसीएफटी’ मंजूर
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात साधुग्राम आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणार्या भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन 635 एमसीएफटी पाण्याचे स्वतंत्र आकस्मिक आरक्षण मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये गंगापूर धरणातून 65 एमसीएफटी, तर दारणा धरणातून 570 एमसीएफटी पाणी उपलब्ध होणार आहे. कुंभमेळ्यासाठी आवश्यक पाण्याची तरतूद करतानाच शहरातील नागरिकांचा दैनंदिन पाणीपुरवठाही सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे. उपलब्ध साठा पुढील वर्षभर पुरविण्यासाठी पाण्याचा वापर, वितरण आणि गळती नियंत्रण यावर प्रशासनाला विशेष लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
पाणीगळती, चोरीवर कारवाई
उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता असल्याने उपलब्ध साठ्याचा अपव्यय टाळण्यावर बैठकीत भर देण्यात आला. पाणीगळती आणि पाणीचोरी रोखण्यासह धरणांमधून होणारा अवैध पाणीउपसा थांबविण्याचे निर्देश देण्यात आले. अनधिकृत विद्युत पंपांचा वापर करणार्यांविरोधात कारवाई करण्यासाठी जलसंपदा, महसूल आणि पोलिस विभागाच्या पथकांनी समन्वयाने काम करावे, असेही स्पष्ट करण्यात आले.
Water shortage in the city inevitable after Diwali
नरेंद्र महाराज : ‘जेन झी’च्या ताकदीचे 42 उपक्रमांतून दर्शन घडवणार सिडको : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या…
चौकाचौकात भगव्या पताका, घरांवरही फडकले ध्वज नाशिक : प्रतिनिधी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख…
आठ लाखांहून अधिक प्रवाशांची आतापर्यंत नोंदणी नाशिक : प्रतिनिधी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली…
व्यावसायिकांची कोंडी; व्हीआयपींच्या स्वागताच्या मुद्यावरून नाराजीनाट्य त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ध्वजारोहणाच्या त्र्यंबक…
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचे मनपाला पत्र नाशिक : प्रतिनिधी द्वारका ते नाशिकरोड येथील दत्त मंदिर…
नाशिक : प्रतिनिधी राज्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन ऐन दिवाळीच्या सणात होणारी 15 टक्के हंगामी…