विद्यार्थी आंदोलनाचा वणवा राज्यभर पेटवू

अभिजित दीपके : उपोषण थांबवा, मुंबईत लढा उभारा

नाशिक : प्रतिनिधी
ग्रामीण आणि आदिवासी भागातील परिस्थिती बदलण्यासाठी आता जनतेलाच संघर्ष करावा लागेल, विद्यार्थ्यांच्या प्रत्येक मागणीला पूर्ण पाठिंबा असून, पुढील आंदोलनासाठी मुंबईत जाण्याची वेळ आल्यास आवश्यक ती सर्व मदत करू, आदिवासी विद्यार्थ्यांची ढासळती प्रकृती पाहून उपोषण मागे घ्या, पण आंदोलन थांबवू नका. तुमचा जीव या लढ्यापेक्षा मोठा आहे. संवेदनाहीन सरकारला तुमच्या जिवाची किंमत नसेल, मात्र महाराष्ट्राला तुमचा आवाज हवा आहे. हा लढा आधिक व्यापक करून संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनाचा वणवा पेटवू, असे सीजेपीचे अध्यक्ष अभिजित दीपके यांनी सांगितले.
गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काल आदित्य ठाकरेंपाठोपाठ सीजेपी अध्यक्ष अभिजित दीपके यांनीही सायंकाळी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर आणि आदिवासी विकास विभागाच्या कारभारावर जोरदार टीका केली.
आदिवासी आश्रमशाळा, वसतिगृहे, विद्यार्थ्यांना मिळणारे भोजन, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि शैक्षणिक सुविधांच्या प्रश्नांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी करत विद्यार्थ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी गरज पडल्यास थेट मुंबईत जाऊन आंदोलन करण्याची भूमिका त्यांनी मांडली. आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांना दुपारी शिळे व निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला. पहाटे तयार केलेले अन्न दुपारी विद्यार्थ्यांना दिले जाते, तसेच सेंट्रल किचनमधून मिळणार्‍या डाळी व इतर पदार्थांच्या गुणवत्तेबाबतही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी आश्रमशाळा आणि वसतिगृहांची अवस्था अत्यंत खराब असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेशी जागा नाही, पिण्याच्या पाण्याची सुविधा अपुरी आहे आणि अनेक स्वच्छतागृहांना दरवाजेही नाहीत, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. या परिस्थितीला जबाबदार धरून आदिवासी विकास मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणीही करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आलेल्या एका सचिवांनी आंदोलनाला ‘तमाशा’ म्हटल्याचा आरोप करत संबंधित अधिकार्‍याला तातडीने निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री नाशिकमध्ये येऊनही आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट न घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांच्या दाव्याला आव्हान
‘75 टक्के जिल्हा परिषद शाळा चांगल्या आहेत’ हा दावा फेटाळून लावत केवळ कागदावरील आकडेवारी न मांडता प्रत्यक्ष शाळांची स्थिती पाहण्याचे आव्हान देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः विदर्भातील आदिवासी आश्रमशाळांना भेट देऊन तेथील परिस्थिती पाहावी, अशी मागणीही करण्यात आली. सरकारी आणि जिल्हा परिषद शाळा खरोखरच उत्तम असतील, तर त्या शाळांमध्ये प्रवेशासाठी रांगा का लागत नाहीत, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
16 दिवस आंदोलन, 12 दिवस उपोषण
विद्यार्थ्यांचे गेल्या 16 दिवसांपासून आंदोलन सुरू असून 12 दिवसांपासून उपोषण सुरू असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. एवढा कालावधी उलटल्यानंतरही सरकारने पुरेशी दखल घेतलेली नसल्याची टीका करण्यात आली. विद्यार्थ्यांनी प्रकृतीची काळजी घेत उपोषणाबाबत विचार करावा आणि आपल्या संविधानिक अधिकारांचा वापर करून थेट मुंबईत जाऊन सरकारकडे मागण्या मांडाव्यात, असे आवाहन दीपके यांनी यावेळी केले.
‘बी टीम’च्या आरोपावर टीका
सत्ताधारी पक्षाकडून या आंदोलनाला काँग्रेस किंवा आम आदमी पक्षाची ‘बी टीम’ म्हटले जात असल्याच्या आरोपावरही टीका करण्यात आली. गेल्या 80 वर्षांत काँग्रेसने आणि गेल्या 12 वर्षांपासून सत्तेत असलेल्या विद्यमान सरकारने ग्रामीण व आदिवासी भागातील शाळांची अवस्था अपेक्षित प्रमाणात सुधारली नसल्याचा आरोप करण्यात आला. अभिजीत दिपके यांनी आदिवासी विकास मंत्री, राज्यातील आदिवासी आमदार आणि खासदारांना विद्यार्थ्यांकडे स्वतःच्या मुलांप्रमाणे पाहण्याचे आवाहन केले. आपल्या मुलांच्या शिक्षण, भोजन आणि शाळेच्या सुविधांची जशी काळजी घेतली जाते, तशीच काळजी आदिवासी विद्यार्थ्यांचीही घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

We will ignite a wildfire of student agitation across the state.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *