महाराष्ट्र

शेतकर्‍यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही

शिंदेंची ग्वाही; दुष्काळग्रस्तांंसाठी 100 ट्रक शिधा रवाना

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. शेतकर्‍यांच्या मदतीसाठी शिवसैनिक खांद्यावर भगवा घेऊन बांधावर दिसेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या हीरकमहोत्सवी दसरा मेळाव्यात दिली. शेतकर्‍यांसाठी दिवाळीचा शिधा घेऊन 100 ट्रक रवाना करण्यात आले असून, गरजेनुसार आणखी फेर्‍या काढण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर टीकेची झोड उठवली.
गेल्या वर्षी अतिवृष्टीने पिके, जमीन आणि पशुधनाचे नुकसान झाले, तर यंदा पावसाअभावी उभी पिके करपली आहेत. शेतकरी संकटात असताना आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा त्याच्या मदतीला धावून जाणे महत्त्वाचे आहे, असे शिंदे म्हणाले. शेतकर्‍यांच्या कुटुंबांतील महिलांना 25 हजार शिलाई यंत्रे आणि मुलींना 25 हजार सायकलींचे वाटप सुरू केले आहे. दुष्काळामुळे मुलींची लग्ने रखडू नयेत, यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्यांची जबाबदारीही शिवसेना घेणार आहे. मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याची ग्वाही त्यांनी दिली.
सरकारने दुष्काळ जाहीर करून विविध सवलतींसह पाच हजार रुपयांची तातडीची मदत घोषित केली आहे. या रकमेवरून टीका करणार्‍यांना प्रत्युत्तर देताना, ही तातडीची मदत असून, शेतकर्‍यांना नियमानुसार दुष्काळी मदत मिळणारच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. कर्जमाफीसाठी 32 हजार कोटी रुपयांचे नियोजन असल्याचा दावाही त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली असून, केंद्र आणि राज्य सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधकांकडून सातत्याने होणार्‍या मतचोरीच्या आरोपांचा समाचार घेताना शिंदे यांनी 2019 मधील सत्तास्थापनेचा मुद्दा उपस्थित केला. शिवसेना-भाजपला मतदान करणार्‍या जनतेच्या जनादेशाविरोधात महाविकास आघाडीने सरकार स्थापन केले, तीच खरी मतचोरी होती, असा आरोप त्यांनी केला. निवडणुकीत विजय मिळाला की ईव्हीएम योग्य आणि पराभव झाला की त्यावर प्रश्न उपस्थित करायचे, ही विरोधकांची दुटप्पी भूमिका असल्याचे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांविरोधात मोर्चे काढण्यावरून त्यांनी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवरही टीका केली. संविधान धोक्यात असल्याचा प्रचार करून विरोधक जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
काँग्रेसच्या काळातील कथित घोटाळे, दहशतवादी हल्ले आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवरूनही त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला गती दिल्याचा दावा करत विरोधकांना विकास पाहवत नसल्याची टीका त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधताना, 2019 मधील सत्तास्थापनेचा निर्णय हा महाराष्ट्राच्या जनादेशाशी केलेला विश्वासघात होता, असे ते म्हणाले.
शिवसेनेतील संभाव्य पक्षप्रवेश आणि संघटनात्मक विस्ताराबाबत बोलताना शिंदे यांनी ‘ऑपरेशन’ची तारीख आधी जाहीर केली जात नाही, तर थेट कारवाई केली जाते, असे सूचक विधान केले. निवृत्त उच्च न्यायालयीन न्यायमूर्ती श्रीहरी डावरे, वरिष्ठ सरकारी वकील अविनाश कामखेडकर आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती अमित कदम यांच्या पक्षप्रवेशाचा उल्लेख करत त्यांनी पक्षाची ताकद वाढत असल्याचे सांगितले. भाषणाच्या शेवटी शिंदे यांनी शिवसैनिकांना दुष्काळग्रस्त भागांत सक्रिय राहण्याचे आवाहन केले. शेतकर्‍यांचे पंचनामे, सरकारी मदत, वीज, पाणी, चारा आणि मुलांचे शिक्षण याकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आरोपांना उत्तर आरोपांनी नव्हे, तर कामातून देणार, असे सांगत शेतकर्‍यांच्या पाठीशी अखेरच्या श्वासापर्यंत उभे राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.

We will not let the farmers’ Diwali be a bleak one.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

1 day ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

2 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

2 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

2 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

2 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

2 days ago