खरातला जामीन मिळू नये, यासाठी सर्व मुद्दे मांडणार

उज्ज्वल निकम : सहा प्रकरणांत आरोपपत्र दाखल

सिडको : प्रतिनिधी
भोंदू आणि स्वयंघोषित कॅप्टन म्हणून चर्चेत असलेल्या अशोक खरातविरोधात महिला लैंगिक अत्याचाराच्या आरोपांप्रकरणी आठ गुन्हे दाखल आहेत. त्यांपैकी सहा गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. आणखी दोन गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल होणे बाकी आहे, अशी माहिती सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली.
यातील एका गुन्ह्यात जामीन मिळावा, यासाठी खरातच्या वतीने न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. मात्र, या जामीन अर्जाला सरकारी पक्षाकडून विरोध करण्यात येणार आहे. खरातला जामीन का देऊ नये, याबाबत सरकारी पक्षाने आपल्या खुलाशात सविस्तर विवेचन केले असून, सुनावणीवेळी त्यावर सविस्तर युक्तिवाद करण्यात येणार असल्याचे निकम यांनी सांगितले. खरातच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार होती. मात्र, आरोपीचे वकील कामानिमित्त बाहेर असल्याने ते सुनावणीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, जामीन अर्जावर आता 16 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. अशोक खरातला जामीन मिळू नये, यासाठी सर्व संबंधित मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येतील, असे अ‍ॅड. निकम यांनी स्पष्ट केले. दरम्यान, खरातविरोधात दाखल असलेल्या आठ प्रकरणांपैकी सहा प्रकरणांचा तपास पूर्ण करून त्यात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. उर्वरित दोन प्रकरणांमध्ये तपास सुरू असून, त्यांचे आरोपपत्र दाखल होणे बाकी आहे. त्यामुळे आगामी सुनावणीत सरकारी पक्षाकडून करण्यात येणार्‍या युक्तिवादाकडे लक्ष लागले आहे.

We will present all arguments to ensure Kharat is denied bail.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *