तुलसीविवाह पार पडले की लगीनसराई सुरू होते. आजूबाजूला लग्नाच्या गाण्यांचे आणि वरातींचे आवाज कानी पडू लागतात. हिंदू धर्मात 16 संस्कारांपैकी पाणिग्रहण म्हणजेच विवाह संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ब्रह्मचर्याश्रमातून गृहस्थाश्रमाला सुरुवात करण्यापूर्वी जो संस्कार केला जायचा त्यालाच पूर्वी विवाहसंस्कार म्हटले जात असे. गृहस्थाश्रमाला सुरुवात करण्यातील आरंभीचा टप्पा म्हणून विवाह संस्काराचे महत्त्व आजही अबाधित आहे. देव, अग्नी आणि ब्राह्मण यांच्या साक्षीने हा विवाहसंस्कार पार पडतो. विवाह संस्कारामध्ये श्रीगणेश पूजन, सीमांतपूजन, मधुपर्कपूजन, गौरीहरपूजन, कन्यादान, मंगळसूत्र बंधन, अक्षतारोपण, मंगलाष्टके, विवाह होम, पाणिग्रहण, लाजाहोम, सप्तपदी, गर्भाधान असे अनेक विधी असतात.
या प्रत्येक विधीच्या वेळी म्हटले जाणारे मंत्र आणि केल्या जाणार्या कृती यामागे ऋषिमुनींचा संकल्प कार्यरत असतो. त्यामुळे हे विधी योग्यरीत्या होणे अत्यंत महत्त्वाचे असते. विवाहसंस्कार म्हणजे उभयतांना केवळ सहचर्य करण्याची अनुमती देणारा संस्कार नसून भावी जीवनात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची सांगड घालण्याची शिकवण देणारा संस्कार आहे. आताचे विवाह पाहता विवाहातील धार्मिक विधींपेक्षा कृत्रिम अवडंबरालाच अधिक महत्त्व दिले जात असल्याचे सर्वत्र दिसून येते. विवाहासारख्या धार्मिक कार्यक्रमाचाही हल्ली इव्हेंट होऊ लागला आहे, त्यामुळे त्यातील सात्त्विकताच लोप पावू लागली आहे.
विवाह जुळविण्यासाठी हुंडा देणे आणि घेणे दोन्हीही भारतीय दंडविधानानुसार गंभीर गुन्हे आहेत. तरीही देशातील अनेक भागांत आजही हुंडा दिला आणि घेतला जात आहे. या हुंड्याच्या लोभामुळे दरवर्षी कितीतरी नववधूंचा छळ केला जातो. त्यांपैकी कितीतरी जणी या छळाला कंटाळून आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग स्वीकारतात. व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामच्या दुनियेेत आजही महागड्या लग्नपत्रिका छापल्या जातात. विवाहाचे बॅनर्स आणि होर्डिंग्ज लावण्याची पद्धत गेल्या काही वर्षांपासून रूढ होत चालली असून, यावरही अवास्तव खर्च केला जातो. निश्चित केलेल्या मुहूर्तावर विवाह लागणे अत्यंत महत्त्वाचे असते.
पुरोहितांकडून मुहूर्ताच्या वेळी वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी देवतांना उपस्थित राहण्यास आवाहन केले जात असल्याने मुहूर्ताला देवता सूक्ष्मरूपाने उपस्थित राहतात, असा शास्त्रसंकेत आहे. त्यामुळे पूर्वी मुहूर्तावर विवाह लागण्यासाठी आधीपासूनच सर्व सिद्धता केली जात असे. आजमितीला विवाहाच्या मुहूर्तापेक्षा जवळच्या नातेवाइकांची उपस्थिती आणि वधू-वरांचा मेकअप यांना अधिक महत्त्व दिले जाते. त्यासाठी विवाह रोखून धरला जातो. अनेक जण विवाह विधी पार पडल्यानंतर स्वागत समारंभाची आणि भोजनाची वेळ पाळून विवाहाला उपस्थित राहतात. पूर्वी लग्नाची मंगलाष्टके म्हणण्यात चढाओढ लागत असे. एक मंगलाष्टक संपले की दुसरे मंगलाष्टक म्हणण्याची संधी साधण्यासाठी उपस्थितांकडून आटापिटा केला जात असे. हल्ली बहुतांश ठिकाणी केवळ मंगलाष्टके म्हणण्यासाठी वाद्यवृंद आणि गायक बोलावले जातात. वधू-वरांनी एकमेकांना पुष्पहार घालून झाल्यावर त्यांच्या मस्तकावर अक्षता वाहण्याची पद्धत आहे. मात्र, अनेकांना याविषयी पुरेशी माहिती नसल्याने मंगलाष्टके चालू असतानाच अक्षता उधळल्या जातात. परिणामी अक्षता वधू-वरांच्या मस्तकावर न पडता कार्यक्रमस्थळी सर्वत्र विखुरल्या जातात. वधू-वरांनी एकमेकांना पुष्पहार घालणे हा विवाहातील एक महत्त्वाचा क्षण असतो. त्यालाही मनोरंजक करण्यासाठी हल्ली वधू-वरांना उगाचच उचलून सहजपणे हार न घालू न देण्यासाठी नातेवाइकांकडून जीवाचा आटापिटा केला जातो. त्यामुळे त्यातील धार्मिकता निघून तो केवळ मनोरंजनाचा खेळ बनतो.
स्वागत समारंभासाठी परिधान करण्यात येणारे हिंदू वधू-वरांचे कपडेही हल्ली पाश्चात्य पद्धतीने शिवण्याची प्रथा पडू लागली आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी विवाह ख्रिश्चनांचा आहे की हिंदूंचा हा उपस्थितांनाही प्रश्न पडतो. विवाह विधी पार पडल्यानंतर सर्वांना एकत्र गोळा करून त्यांच्या समक्ष वधू-वरांकडून महागडा केक कापला जातो. हिंदू धर्मात शिजलेल्या अन्नपदार्थांवर सुरी फिरवणे वर्ज्य मानले जाते. त्यामुळे विवाहासारख्या सात्त्विक कार्यक्रमामध्ये अशी असात्त्विक कृती करणे अयोग्यच म्हणावे लागेल.
हल्ली लग्नाच्या सिद्धतेसाठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला लाखो रुपये देऊन कंत्राट दिले जाते. ही कंपनी विवाहातील धार्मिक विधींना अधिक महत्त्व न देता सोहळा अधिकाधिक मनोरंजक आणि आकर्षक कसा होईल याकडे अधिक लक्ष देतात. त्यामुळे अनेक ठिकाणी धार्मिक विधी चालू असताना दुसरीकडे सिनेसंगीत चालू असते. त्यामुळे उपस्थितांचे लक्ष त्याकडेच अधिक जाते. विवाह विधी सुरू असताना जी शांतता अपेक्षित असते ती न पाळता सर्वत्र गोंगाटाचे वातावरण असते. या कंपन्यांकडून वधू-वरांचे आणि त्यांच्या नातेवाइकांचे सिनेगीतांवर नृत्य बसवले जातात. विवाह विधीनंतर त्याचे विशेष सादरीकरण असते. स्टेजवर लोकांसमोर नाचायचे आहे, तर सर्व व्यवस्थितच व्हायला हवे यासाठी जवळचे नातेवाईक लग्नाच्या तयारीत हातभार लावण्यापेक्षा या नृत्याच्या तयारीतच अधिक व्यस्त असतात. विवाह विधी हा वर आणि वधू या दोहोंच्या नातेवाइकांसाठी आनंदाचा विधी असतो. त्यामुळे विवाहाप्रीत्यर्थ उपस्थितांना प्रीतिभोजन दिले जाते. ते वधू-ऐपतीनुसार दिले जायला हवे. मात्र इथेही आत्मप्रौढीसाठी भोजनात नको तितक्या पदार्थांची रेलचेल पाहायला मिळते. विवाह संस्कारांत शिरलेल्या अनिष्ट प्रथांचे समूळ उच्चाटन झाले की, त्यासाठी केला जाणारा अवास्तव खर्चही वाचेल. यासाठी सर्वांनीच पुढाकार घेऊन देखाव्यापेक्षा परंपरागत धार्मिक विधींना प्राधान्य द्यावे.
Wedding ceremonies are turning into events…
- वासवदत्ता अग्निहोत्री चित्रपटात, नाटकात, जुन्या कथांमधून आपण हे बर्याच वेळेस ऐकलेय. अधिकारीवर्ग, दवंडी पिटून…
- सुजाता येवले पूर्वीच्या काळातले दिवे लागण्याच्या कातरवेळेला वातावरण आणि मन शुभ पवित्र, ऊर्जाभारित बनवणारे,…
- सीमाताई मराठे राज्यातील आरोग्य व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे.…
सहकार्याच्या पडद्यामागे महासत्तांचा संघर्ष! - समाधान कदम जागतिक राजकारणात महासत्तांमधील संघर्षाचे स्वरूप काळानुसार बदलत गेले…
- राजेश शिरभाते राज्यातील विविध प्रकल्पांसाठी व ते सुरळीत कार्यान्वित होण्यासाठीचे अनेक महत्त्वाचे सल्ले काल…
भाच्याने गमावला पाय; मामाच्या हाताची बोटे तुटली इगतपुरी : प्रतिनिधी इगतपुरी रेल्वेस्थानकावर पंचवटी एक्स्प्रेसमधून प्रवास…