मालेगाव तालुक्यावर दुहेरी संकटाचे सावट

पावसाने दडी मारल्यास 83 गावे, 49 वाड्यांवर जलटंचाईची भीती

मालेगाव : प्रतिनिधी
पावसाने आणखी पाठ फिरवल्यास मालेगाव तालुक्यातील तब्बल 83 गावे आणि 49 वाड्यांवर गंभीर जलटंचाईचे संकट कोसळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. एकीकडे मान्सूनचा लांबलेला प्रवेश आणि अल निनोचा प्रभाव, तर दुसरीकडे सतत वाढणारे तापमान यामुळे तालुक्यात दुहेरी संकट निर्माण झाले आहे. गेल्या आठवडाभरापासून 41 अंशांच्या आसपास स्थिर असलेले तापमान शुक्रवारी (दि. 19) एक अंशाने वाढून 42 अंश सेल्सिअसवर पोहोचले असून, भर पावसाळ्यातही उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर पंचायत समिती व महसूल विभागाने संयुक्तरीत्या पुरवणी पाणीटंचाई आराखडा तयार करून संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. सध्या तालुक्यातील 16 गावे आणि 48 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, सुमारे 37 हजार 195 नागरिकांचे पिण्याचे पाणी टँकरवर अवलंबून आहे. पावसाचा खंड कायम राहिल्यास जुलै ते सप्टेंबर या कालावधीत टँकरद्वारे पाणीपुरवठा अधिक व्यापक करण्याची तयारी प्रशासनाने
केली आहे.
भारतीय हवामान खात्याने अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची किंवा दीर्घ खंड पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करत सर्व तालुक्यांना पुरवणी टंचाई आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
मालेगाव तालुका यंदा सलग अडीच महिन्यांहून अधिक काळ उष्णतेच्या लाटेने होरपळला असून, जलसाठ्यांमध्ये मोठी घट झाली आहे. विहिरी, बोअरवेल आणि पारंपरिक जलस्रोतांची पातळी लक्षणीयरीत्या खाली गेल्याने परिस्थिती अधिक गंभीर
झाली आहे.
गतवर्षी काही प्रमाणात पाऊस झाल्याने तालुका सप्टेंबरच्या प्रारंभी टँकरमुक्त झाला होता. मात्र, यंदा जूनचा तिसरा आठवडा संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने चिंता वाढली आहे. दुधे, घोडेगाव, सावकारवाडी, मेहुणे, जळगाव, गारेगाव, वर्‍हाणे आणि ज्वार्डी बुद्रुक यांसह अनेक गावांमध्ये टँकरवर अवलंबित्व कायम आहे.
दरम्यान, वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळेत शहर व ग्रामीण भागातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून, नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. सातत्याने 40 ते 42 अंश सेल्सिअसदरम्यान राहणार्‍या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढला असून, पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्‍यांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. खरीप हंगामाची तयारी रखडल्याने शेती नियोजनावरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विविध उपाययोजनांवर भर

प्रांताधिकारी नितीन सदगीर, तहसीलदार विशाल सोनवणे आणि गटविकास अधिकारी भरत वेंदे यांनी टंचाई आराखडा तयार केला असून, विविध उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. त्यामध्ये प्रगतीपथावरील नळपाणी योजना पूर्ण करणे, विंधन विहिरी घेणे, नळयोजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळयोजना, विहिरी खोल करणे, बुडकी घेणे, खासगी विहिरी अधिग्रहित करणे तसेच टँकर व बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा यांचा समावेश आहे.

ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण

सध्याच्या आकडेवारीनुसार 16 गावे आणि 48 वाड्यांमध्ये 16 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, मंजूर 31 खेपांपैकी 28 खेपा प्रत्यक्षात पूर्ण केल्या जात आहेत. प्रशासनाने तयारी केली असली तरी पावसाच्या अनिश्चिततेमुळे ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण कायम आहे. आता सर्वांचे लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागले असून, समाधानकारक पाऊस हाच या संकटावरचा एकमेव दिलासा ठरणार आहे.

Malegaon Taluka under the shadow of a dual crisis.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *