आजकालचा माणूस आपली कर्तव्ये व आपली जबाबदारी पूर्णपणे विसरून गेला आहे. स्वार्थी, कपटी, ढोंगी व लबाड लांडगा बनून केवळ आणि केवळ स्वतःचे हित साधण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. लोकांना फसवून, अफरातफर करून, वाईट मार्गाने पैसा गोळा करून आणि कामात भ्रष्टाचार करून माणूस श्रीमंत होण्याचा प्लॅन आखत आहे.
केवळ स्वतःचेच भले व्हावे आणि दुसर्यांचे काही का होईना, अशी लोकांची मानसिकता बनली आहे. म्हणजे हल्ली लोक फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या घर परिवाराचा विचार करून जीवन जगत आहेत. दुसर्यांचे काहीही होवो, फक्त आपण आणि आपला परिवार सुखी व आनंदी राहावा, हाच विचार करून आजकालचे लोक जीवनाची वाटचाल करत आहेत. काही माणसांना वाटत असते की, वाटोळे व नुकसान झाले तरी दुसर्यांचे व्हावे, आपले होऊ नये, ही भावना ठेवून जगणारे लोक सध्या खूप वाढले आहेत. कोणाचा अपघात झाला, कोणी भीषण संकटात अडकला, कोणावर दुःखाचा डोंगर कोसळला, कोणी आर्थिक संकटात सापडला, कोणी मोठ्या आजाराने दवाखान्यात दाखल झाला, कोण्या मुलीवर बलात्कार होऊ लागला किंवा कोणत्या माणसावर अन्याय होऊ लागला, तर माणुसकीच्या नात्याने अशा अडचणीत सापडलेल्या गरजू लोकांना धावत जाऊन मदतीचा हात देणे, त्यांना त्या संकटातून मुक्त करून त्यांच्यावर आलेले संकट दूर करणे, हे खर्या माणसाचे कर्तव्य असते. कारण माणुसकीच्या नात्याने सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांना आर्थिक व मानसिक आधार दिला तरच या जगात माणुसकी जिवंत राहणार आहे; परंतु खेदाची बाब म्हणजे, आजकाल माणूस स्वार्थी व लबाड लांडगा झाल्यामुळे कोणत्या माणसावर भरवसा ठेवावा? नेमके हेच कळणे अवघड झाले आहे. हल्ली माणसाने माणुसकीची सीमा पार केली आहे. माणूस माणसासारखा न राहता व माणसासारखा व्यवहार न करता स्वार्थापायी लबाड बोलून व खोटे बोलून माणुसकीला कलंक लावत आहे. माणसाच्या अंगी असलेले माणुसकीचे सर्व गुण सध्या लुप्त होऊन माणसांमध्ये स्वार्थ खूप बोकाळला आहे. माणूस केवळ स्वतःचा आणि बायको-लेकरांचा विचार करून जीवन जगत आहे. दुसर्यांचे काही का होईना, फक्त आपले आणि आपल्या मुलाबाळांचे कसे चांगले होईल? हेच आजकालचा माणूस बघत आहे.
माणुसकीच्या नात्याने माणसाची कर्तव्ये कोणती? माणसाने माणसासाठी सुखदुःखात व संकट काळात काय करायला हवे? कोणत्यातरी आशेने घरी चालून आलेल्या भिकार्याला किंवा गरीब अनाथ मुलांना दानधर्म करण्याची मानसिकता आत्ताच्या लोकांमध्ये राहिली नाही. माणसाला माणसाची कर्तव्य व जबाबदारी काय असते? याचा थांगपत्ता त्यांना जराही राहिला नाही. एकेकाळी आपल्या देशात कुठेही जा, माणुसकीच माणुसकी पाहायला मिळायची. माणूस माणसाला किंमत द्यायचा. सुखदुःखात व वाईट काळात माणूस माणसाच्या मदतीला सुसाट वेगाने धावत यायचा. तेव्हाच्या माणसांना माणसांची कर्तव्य व जबाबदारी काय असते? आणि गरजू व संकटात सापडलेल्या माणसांना कोणती मदत करायची असते? याचे पुरेपूर नॉलेज जुन्या माणसांना होते. तेव्हाच्या माणसांमध्ये माणुसकीचे सर्व गुण ठासून भरलेले होते. त्याकाळी माणसे म्हणावे तेवढे शिकलेले नव्हते. अल्पशिक्षित व निरक्षर असूनसुद्धा तेव्हाच्या माणसांना माणुसकीच्या नात्याने, माणसांची कर्तव्य व जबाबदारी काय असते? याची पूर्ण जाणीव होती. आता देशात सुशिक्षित लोकांचे प्रमाण खूप वाढले आहे. निरक्षर लोकांचा वाढता आकडा कमी झाला आहे. तेव्हा प्रश्न पडतो की, सुशिक्षित लोक एवढे शिक्षण घेऊनदेखील न शिकलेल्या अज्ञानी माणसासारखे का वागतात? त्यांना माणुसकी धर्म का कळत नाही? माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे, हे त्यांना का कळत नाही? मी म्हणत नाही, की सगळीच माणसे माणुसकीला विसरून वागत आहेत. या पृथ्वीतलावर माणुसकीला जीवापाड जपणारी माणसे अजूनही जिवंत आहेत; परंतु त्यांचे प्रमाण सध्या कमी झाले आहे आणि माणुसकीला विसरून स्वार्थ साधणार्या लबाड लांडग्यांचा सुळसुळाट वाढला आहे.
म्हणूनच देशात जिकडेतिकडे बलात्कार, व्याभिचार, अनाचार आणि भ्रष्टाचार प्रचंड फोफावला आहे. रोज देशाच्या कानाकोपर्यांत कुठे ना कुठेतरी बलात्कार होतोच. पाच वर्षांच्या निष्पाप व निरागस चिमुकलीपासून ते वयोवृद्ध आजीपर्यंत बलात्कार करणारे महाभाग देशात खूप आहेत. शासनाने अशा नराधमांचा बंदोबस्त वेळीच करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी आणि पीडित महिलेला व मुलीला न्याय द्यावा. माणुसकीच्या नात्यामध्ये आई-वडिलांचे नाते हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असते. आई-वडिलांनी आपल्याला जन्म दिलेला असतो, बोटाला धरून चालायला शिकवलेले असते, पालनपोषण केलेले असते आणि त्यांना उच्चशिक्षित करून मोठ्या पदावर बसवलेले असते.
तरीसुद्धा आजकालची मुले आई-वडिलांच्या उपकाराची जाणीव न ठेवता आई-वडिलांपासून अलिप्त राहून बायको-मुलांसमवेत आनंदाने जीवन जगत आहेत. त्यांचे आई-वडील मात्र वृद्धाश्रमात खितपत पडून शेवटच्या घटका मोजत आहेत. तरीसुद्धा बरीच मुले आई-वडिलांना भेटण्यासाठीसुद्धा येत नाहीत. लांबूनच फोनवर दोन गोष्टी बोलायच्या आणि फोन ठेवायचा. ही मानवतेला न शोभणारी अत्यंत दुःखद बाब आहे. आई-वडिलांनी लहानाचे मोठे करून व त्यांना शिक्षणाचे बाळकडू पाजून नोकरीला लावले, तीच मुले जर आई-वडिलांना म्हातारपणात आधार न देता वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवत असतील तर खरंच या देशात माणुसकी जिवंत नाही, असेच म्हणावे लागेल. तसेच भावंडांमध्ये शेतीच्या कमी-जास्त वाटणीवरून जोराचे भांडणतंटे चालू आहेत. बरेच भाऊ घरासाठी व जमिनीसाठी सख्ख्या भावासोबत पक्के वैर धरून एकमेकांना संपवण्यासाठी एकमेकांवर टपून बसले आहेत.
भावकीतील चार भाऊ तेव्हाच सोबत असतात जेव्हा पाचवा भाऊ मरण पावल्यानंतर खांद्यावर असतो. म्हणजे शेतीच्या किंवा घराच्या भांडणावरून सख्खे भाऊ एकमेकांचे पक्के वैरी बनून मरेपर्यंत एकमेकांचे तोंड बघत नाहीत. मरण पावल्यावर मात्र भावाला खांदा द्यायला व भावाला पाणी पाजायला हमखास येतात. मेल्यानंतर भावाला खांदा देण्यात आणि पाणी पाजण्यात काय अर्थ? मेल्यावर त्याला काय कळणार की, माझा भाऊ माझ्यासाठी खांदा देत आहे की, पाणी पाजत आहे म्हणून. माणसाची कर्तव्ये व जबाबदारी ओळखून माणसासारखे वर्तन करा आणि या देशातून लोप पावत चाललेली माणुसकी पुन्हा जिवंत करा!
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…