– राजेश शिरभाते
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गेल्या रविवारी पुण्यात छात्रों की गूंज हा कार्यक्रम केला. त्यानंतरचा संपूर्ण आठवडा समाजमाध्यमांवर त्यांच्या या कार्यक्रमाचीच चर्चा होती. हा कार्यक्रम रोखण्यासाठी सत्ताधारी पक्षातर्फे जंग जंग पछाडण्यात आले. तरीही राहुल गांधी यांचा हा कार्यक्रम अपेक्षेपेक्षाही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला. या कार्यक्रमाला देशातील तरुणींनी आणि महिलांनी दिलेला प्रतिसाद अभूतपूर्व होता. राहुल गांधी यांनी पुण्यात नेमके काय केले, हे पाहणे फार महत्त्वाचे आहे. या देशाच्या राजकारणाची दिशा बदलून टाकणारे पहिले पाऊल त्यांनी टाकले आहे.
आतापर्यंत राजकीय आखाड्यात काही सन्माननीय अपवाद सोडून केवळ पर्याय किंवा कुटुंबातील सदस्य इतक्या मर्यादित स्वरूरुपात पाहिलेल्या महिलाशक्तीला मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यांचा प्रयत्न हा देशाच्या इतिहासात नक्कीच नोंदवला जाईल. येणार्या पिढ्या त्याचे संदर्भ वापरतील असा झाला.
देशातील कॉक्ररोच जनता पार्टीने विद्यार्थ्यांच्या पेपरफुटीच्या मुद्द्यावर आंदोलन केले. सुरुवातीला त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा आणि नंतर ते पोलिसांच्या व काही गुंडांच्या मदतीने चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. सारी व्यवस्था या तरुणांच्या विरोधात उभी राहिली, तरीही हे आंदोलन शिक्षणमंत्र्याचा राजीनामा घेऊन थांबले. त्यावर सरकारने त्याच शिक्षणमंत्र्याचा संसदेत गौरव व सत्कार करून विद्यार्थ्यांना चिडवले असले, तरी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाने अनेक गोष्टींना वाचा ही फोडलीच. या काळात या तरुणांबरोबर राहुल गांधी उभे राहिले. त्यांनी तरुणांचे प्रश्न केवळ संसदेतच मांडले नाहीत, तर प्रत्यक्ष तक्रार दाखल न करून घेणार्या पोलीस स्थानकात बसूनही त्यांनी आपला पाठिंबा दिला. त्याचा पुढचा अध्याय त्यांनी आता देशातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये जाऊन छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरू केला आहे. महाराष्ट्रात हा कार्यक्रम पुण्यात झाला. या कार्यक्रमाला फारशी गर्दी येणार नाही असे आधी प्रशासनाला वाटले. मात्र, नोंदणीच्या माध्यमातून अगदी शिस्तबद्ध आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने गर्दीचे उच्चांक मोडले. बरं ही गर्दी जमवलेली किंवा ट्रकमध्ये भरून आणलेली नव्हती. हे सारे उत्स्फूर्तपणे आले होते. त्यात मुलींचे प्रमाण फार फार मोठे होते. सत्ताधारी पक्षाने त्यांच्यावर 25 हजार रुपये देऊन ही गर्दी आणल्याचा त्यांचा नेहमीचा अफवांचा फंडा वापरला. एका कोणीही ओळखत नसलेल्या समाजमाध्यमावरच्या मुलीनेही आपल्याला 25 हजार देण्यात येणार होते, असे म्हटले. अर्थात, त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. ते असो. या कार्यक्रमाला विरोध करून किंवा आपले नेहमीचे फंडे वापरून बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्याला कोणीही भीक घातली नाही.
या कार्यक्रमाने काय दिले, हा प्रश्न महत्त्वाचा आहे त्याचबरोबर कोणाकोणाला काय दिले हाही महत्त्वाचा आहे. गेल्या काही वर्षांत या देशात सर्वच कार्यक्रम हे एका पक्षाच्या प्रचारासाठी असतात की काय, असा एक भ्रम निर्माण करण्यात आला आहे. मग ते अगदी मंत्र्यांचा शपथविधी असो की ज्या मंदिरातून निधीची चोरी होते त्या मंदिराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम असो. या कार्यक्रमात काँग्रेस या पक्षाचे कोणतेही चिन्ह नव्हते. त्यांचे नेते व प्रेक्षकांमध्ये बसलेले काही नेते याव्यतिरिक्त कोठेही पक्षाचा प्रचार नव्हता. त्यामुळे सुरुवातीपासूनच हा कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर गेला. देशात सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांंसाठीही एखादा कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो व त्याच्यावर विश्वास असलेले तरुण त्याला
उत्स्फूर्तपणे गर्दी करतात, हे देशाने पाहिले. याआधी बाळासाहेब ठाकरे यांच्या व त्याआधीच्या अनेक नेत्यांच्या सभेला व त्यांचे विचार ऐकण्यासाठी लोक गर्दी करत असत. या कार्यक्रमाचे दुसरे मोठे वैशिष्ट्य म्हणजे, इथे राहुल गांधी त्यांचे विचार ठेवणार नव्हते, तर तरुणांचे व त्यातही विशेष म्हणजे तरुणींचे विचार ऐकणार होते. हे या कार्यक्रमाचे पहिले वेगळेपण होते. याठिकाणी राहुल गांधी यांनी सुरुवातीच्या काही मिनिटांतच कार्यक्रमाची दिशा निश्चित केली. देशातील महिलांच्या स्थितीवर व त्याच्या कारणांवर त्यांनी भाष्य केले. तुम्ही कोणाला बांधील नाही, तर तुम्ही स्वतःला बांधील आहात, हे सांगून त्यांनी अक्षरशः सभागृहाचा ताबा घेतला. या कार्यक्रमाच्या ठिकाणीच नव्हे, तर समाजमाध्यमांवरूनही लाखो लोकांनी हा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहिला. राहुल गांधींनी त्यानंतर मुलींचे म्हणणे, त्यांना होत असलेला त्रास जाणून घेतला. त्यांच्यासमोर मुली इतक्या सहज बोलत होत्या की, जणू आपल्या कोणा मित्राला त्या आपले प्रश्न सांगत आहेत. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी या नेत्यांविषयी लोकांच्या मनात आदर होता. मात्र, एखाद्या नेत्याविषयी मैत्रीची भावना राहुल गांधी यांनी निर्माण केली. त्यांनी महिलांच्या विविध प्रश्नांंना आणि विविध स्तरांतील महिलांना बोलण्याची संधी दिली. त्यात नोकरी करणार्या महिलांपासून ते आदिवासी मुलींचाही समावेश होता. त्यामुळे सर्वांनाच एकमेकांचे दुःख, त्रास जाणून घेण्याची संधी मिळाली. राहुल गांधी यांच्याशी बोलण्यासाठी, त्यांच्याजवळ जाण्यासाठी मुलींची चाललेली धडपड अवर्णनीय होती. असा प्रतिसाद याआधी कधीही कोणत्याही नेत्याला मिळालेला नाही. हा प्रत्यक्ष प्रतिसाद पाहून अनेकांच्या पोटात गोळा उठला असेल. त्यानंतर या आंदोलनाचे कौतुक आणि राहुल गांधी यांच्या एकेका वाक्याची फोड करून त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्याची एक लाटच समाजमाध्यमावर उसळली. यातील बहुसंख्य व्हिडीओे महिलांनी तयार केलेले होते. नेहमी आपले व्हिडीओे करणार्या महिला यात होत्या. त्याचबरोबर पहिल्यांदाच असा प्रयत्न करणार्यांची संख्याही लक्षणीय होती. एखाद्या राजकीय नेत्याच्या भाषणावर अशा प्रकारे प्रतिसाद देण्याची पद्धतही सुरू करण्याचे श्रेय राहुल गांधी यांना द्यावे लागेल. ते जे करतात त्याची कॉपी करण्याची एक लाटच उसळलेली आहे. असे असले, तरी त्यांना जे उस्फूर्तपणे मिळते ते इतरांना कोट्यवधी रुपये खर्च करूनही मिळत नाही. राहुल गांधींनी जरी महिलांचे प्रश्न मांडले असले तरी देशातील पुरुषांमध्ये त्यातही सर्वच वयोगटातील नागरिकांमध्ये त्यांच्या विषयीचा एक जबरदस्त विश्वास निर्माण झालेला पाहायला मिळाला. राहुल गांधी यांच्या विरोधात बदनामीची मोहीम राबवून त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करणार्यांचे सर्व प्रयत्न जनता कशा प्रकारे उलटवून लावते, हे या कार्यक्रमाने पाहायला मिळाले. आजचा तरुण व त्याचे वाचन आणि सर्वच गोष्टींकडे पाहण्याचा त्याचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन एक नवी आशा निर्माण करून गेला आहे. हे या कार्यक्रमाचे मोठे फलित म्हणावे लागेल.
What did Rahul Gandhi do in Pune?