– अश्विनी पांडे
नाशिक शहराला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. शहराने अनेक कलावंत घडवले. कलावंतांच्या कलेसाठी आवश्यक बाब म्हणजे रंगमंच. शहरातील नाट्यगृहातील हे रंगमंच समस्यांच्या गर्तेत अडकले आहेत. नाशिक शहरात वर्षभरात कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक कामे सुरू आहेत. यातून शहराचा निश्चित चेहरामोहरा बदलेल, पण हे बदलत असताना शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या नाट्यगृहाचे आधुनिकीकरण होऊनही नाट्यगृह सुसज्ज होतील का आणि नाट्यगृहाचे शुक्लकाष्ट संपेल का, असा सवाल कलावंत व नाट्यरसिकांना पडला आहे.
नाशिक शहराला समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. साहित्य, नाटक, संगीत, कीर्तन, लोककला अशा विविध क्षेत्रांत या शहराने मोठे योगदान दिले आहे. अनेक नामवंत साहित्यिक, कलाकार आणि विचारवंत या शहराने घडवले. साहित्यिक, लेखक, कलावंतांनी आपल्या कार्यातून नाशिकच्या सांस्कृतिक विश्वाला एक वेगळी ओळख मिळवून दिली. या परंपरेमुळे नाशिकला सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर म्हणून ओळख मिळाली. मात्र, काळाच्या ओघात आणि बदलत्या जीवनशैलीमुळे या सांस्कृतिक चळवळीसमोर काही नवी आव्हाने उभी राहिली
आहेत.
नाशिक शहराला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. शहराने अनेक मोठे कलावंत, नाटककार, अभिनेते घडवले आहेत. इतकेच नाही तर नवीन पिढीतील अनेक हरहुन्नरी कलावंत आपल्या अभिनयाने मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कलेने रसिकांचे मन जिंकत आहेत. मात्र, ज्या शहराने अनेक कलावंत घडवले, त्या शहरातील सांस्कृतिक चळवळीला नाट्यगृहातील अपुर्या सोयीसुविधांमुळे खीळ बसत असल्याचे चित्र आहे. कलाकृती सादर करताना कलाकार त्या कलेत आपला प्राण ओतत असतो, मात्र असे असताना ऐनवेळी जर नाट्यगृहात सुविधा नसल्या तर त्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागते. याचाच अनुभव अनंत कुबल एकांकिका
स्पर्धेच्या निमित्ताने कलावंतांना आला. या एकांकिका
स्पर्धेसाठी राज्यभरातून कलावंत सहभागी झाले होते. मात्र, ऐनवेळी वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याने कलावंतांना घामाच्या धारांत एकांकिका सादर करावी लागली. मात्र, नाट्यगृहाच्या अपुर्या सोयीसुविधेची अनेक उदाहरणे आहेत. याआधीही शहरातील सर्वच नाट्यगृहांना काहीना काही समस्यांनी घेरले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कलावंतांना कला सादर करताना नाट्यगृहातील अपुर्या सोयीसुविधांचादेखील सामना करावा
लागतो.
नाशिकची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. शहराचा विस्तारही मोठ्या प्रमाणावर होत आहे. परंतु, त्या तुलनेत शहरातील नाट्यगृहांची संख्या कमी असल्याची वस्तुस्थिती आहे. मुंबई, पुणे किंवा ठाणे यांसारख्या शहरांच्या तुलनेत नाशिकमध्ये नाट्यगृहांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे प्रायोगिक नाटके, स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत मैफली, व्याख्याने किंवा इतर सांस्कृतिक उपक्रम यांना योग्य स्थळ मिळण्यात अनेकदा अडचणी निर्माण होतात. काही वेळा नाट्यगृह उपलब्ध नसल्यामुळे चांगले कार्यक्रम आयोजित करणे कठीण होते किंवा ते कार्यक्रम पुढे ढकलावे लागतात. शहरात जी नाट्यगृहे आहेत, त्यातही अनेक समस्या असल्याचे चित्र आहे. शहरात असलेली काही नाट्यगृहेही कालबाह्य होत चालली आहेत. त्या ठिकाणी ध्वनिव्यवस्था, प्रकाशयोजना, आसनव्यवस्था किंवा पार्किंग यांसारख्या सुविधांचा अभाव असल्याची तक्रार रंगकर्मी आणि रसिकांकडून अनेकदा व्यक्त केली जाते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सांस्कृतिक कार्यक्रमांची सादरीकरणेही अधिक दर्जेदार आणि आकर्षक होण्याची गरज आहे. त्यासाठी अत्याधुनिक सुविधा असलेली नाट्यगृहे आवश्यक आहेत. कालिदास कलामंदिर, प. सा. नाट्यगृह, मु. शं. औरंगाबादकर सभागृह, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, रावसाहेब थोरात सभागृह, गुरुदक्षिणा हॉल यांसारख्या ठिकाणी विविध कार्यक्रम होत असतात. मात्र, यातील काही नाट्यगृहांना समस्यांनी घेरले आहे.
स्मार्टसिटी अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून कालिदास कलामंदिर नूतनीकरण करण्यात आले, मात्र समस्या जैसे थे असल्याचे चित्र आहे. अनंत कुबल एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने हे दिसून आले. या आधीही कालिदास कलामंदिरातील अपुर्या सोयीसुविधांबाबत ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, अभिनेते भरत जाधव, वैभव मांगले यांनीदेखील नाराजी व्यक्त केली होती. शहरातील इतर नाट्यगृहांनादेखील अनेक समस्या आहेत. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरातील नाट्यगृहांचेही नूतनीकरण व्हावे, ही अपेक्षा नाट्यकलावंत व नाट्यरसिक व्यक्त करत
आहेत.
When will the theater’s drought end?