कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?

महाराष्ट्र ही संतांची भूमी ही ओळख केवळ इतिहासापुरती मर्यादित राहते की काय, असा प्रश्न आजच्या घडामोडींकडे पाहताना निर्माण होतो. ज्या भूमीने देशाला प्रबोधनाचा मार्ग दाखवला, विवेक, विचार आणि सामाजिक सुधारणा यांचे धडे दिले, त्याच भूमीत अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि नैतिक अधःपतनाचे सावट दाटताना दिसत आहे. परिणामी, आज प्रत्येक जागरूक नागरिकाच्या मनात एकच प्रश्न धुमसतोय तो म्हणजे ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?’

महाराष्ट्राची ओळख ही संत, समाजसुधारक आणि विचारवंतांची भूमी अशी राहिली आहे. संत तुकाराम महाराजांनी अभंगांतून अंधश्रद्धेवर प्रहार केला आहे.
जे का रंजले गांजले ।
त्यासि म्हणे जो आपुलें ॥
तोचि साधु ओळखावा ।
देव तेथेंचि जाणावा ॥1॥
त्यांच्या या अभंगातून साधूकडे कोणते गुण असावेत आणि भोंदूच्या दांभिकतेवर भाष्य करण्यात आले आहे.दुसर्‍या एका अभंगात ते म्हणतात, ऐसे कैसे झाले भोंदू.. राख अंगास लावूनिया म्हणती साधू.. मात्र, संत तुकारामांच्या अभंगाचा महाराष्ट्राला विसर पडल्याचे चित्र आहे. महाराष्ट्राला थोर विचारवंतांची परंपरा आहे. महात्मा फुले यांनी शिक्षण व समतेचा पाया घातला. राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची वाट मोकळी केली, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला नवी दिशा दिली. या सर्वांनी मिळून महाराष्ट्राला प्रगत, पुरोगामी आणि विवेकनिष्ठ राज्य म्हणून घडवले. मात्र, आज या परंपरेला छेद देणार्‍या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत.
नाशिकसारख्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या शहरात भोंदू अशोक खरात प्रकरणाने मोठी खळबळ उडवली आहे. अनेक महिलांचे शोषण, अंधश्रद्धेचा गैरफायदा आणि प्रभावशाली व्यक्तींशी असलेले संबंध या सर्व बाबींमुळे ही घटना केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित राहत नाही, तर समाजाच्या मानसिकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते. विशेष म्हणजे, अशा व्यक्तीभोवती राजकीय नेते, मंत्री आणि उद्योजक यांची उपस्थिती दिसून येणे, हे अधिकच धक्कादायक आहे. काही नामांकित नेत्यांचे फोटो समोर आल्याने भोंदूगिरीला अप्रत्यक्ष राजकीय पाठबळ मिळत असल्याचे चित्र आहे.
राजकारण हे समाजाचे दिशादर्शक असते. जशी राजा तशी प्रजा ही उक्ती आजही तितकीच खरी आहे. जर राज्यकर्तेच विवेकशून्य वर्तन करत असतील किंवा अंधश्रद्धेच्या आहारी जात असतील, तर समाजाकडून विवेकशीलतेची अपेक्षा कशी ठेवायची? सत्तेची लालसा, नैतिकतेचा अभाव आणि केवळ राजकीय फायद्यासाठी घेतले जाणारे निर्णय यामुळे समाजात चुकीचे संदेश जात आहेत. याचा थेट परिणाम म्हणजे अंधश्रद्धेला बळ मिळणे आणि समाजातील मूल्यव्यवस्थेचे अधःपतन होत आहे. महिलांवरील अत्याचार, फसवणूक, खून यांसारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे. विशेषतः भोंदूगिरीच्या माध्यमातून महिलांचे शोषण ही अत्यंत गंभीर बाब बनली आहे. समाजातील दुर्बल घटकांना लक्ष्य करून त्यांचा गैरफायदा घेतला जातो, ही वस्तुस्थिती दुर्लक्षित करता येणार नाही. अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेबाबत भीतीचे वातावरण निर्माण
झाले आहे.
एकीकडे भोंदूगिरीच्या विळख्यामुळे महाराष्ट्राचा प्रबोधनाचा, विचारमूल्यांचा पाया ढासळत असताना सोशल मीडियामुळे खरात प्रकरण देशभर पसरले. त्यामुळे नाशिकसारख्या कुंभनगरीची बदनामी होणे ही केवळ नाशिकचीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणारी आहे. एकेकाळी प्रगत आणि पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणार्‍या राज्याची प्रतिमा अशा घटनांमुळे मलिन होत आहे.
याच पाश्वर्र्भूमीवर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?’ हा प्रश्न राजकीय प्रचाराचा भाग होता. मात्र, आज तोच प्रश्न सामान्य नागरिक प्रत्यक्ष परिस्थितीकडे पाहून विचारत आहेत. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक हे सत्तासंघर्ष, आरोप-प्रत्यारोप आणि फोडाफोडीच्या राजकारणात अडकलेले दिसतात. विकास, सामाजिक सुधारणा आणि जनतेचे प्रश्न हे दुय्यम ठरत आहेत.
आज गरज आहे ती महाराष्ट्राला पुन्हा एकदा प्रबोधनाच्या मार्गावर नेण्याची. अंधश्रद्धेविरोधात कठोर कायद्याची अंमलबजावणी, समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना आणि राजकारणात नैतिकतेचे पुनर्स्थापन या गोष्टी अत्यावश्यक आहेत. समाज आणि शासन या दोघांनीही आपली जबाबदारी ओळखून योग्य दिशा ठरवली पाहिजे.
महाराष्ट्राची खरी ओळख ही संत, विचारवंत आणि प्रबोधनाची आहे. ती जपणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. अन्यथा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? हा प्रश्न केवळ विचारण्यापुरता न राहता, तो कटू वास्तव ठरेल.

Where has Maharashtra been taken?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *