मित्राच्या मदतीने पत्नीचा पतीच्या दागिन्यांवर डल्ला

सिडको : प्रतिनिधी
पत्नीने तिच्या मित्र आणि मेव्हण्याच्या मदतीने घरातून पतीच्या संमतीशिवाय सुमारे सहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी करून परस्पर गहाण ठेवल्याची तक्रार अंबड पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी पत्नी, तिचा मित्र आणि मेव्हणा अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय माधवराव घोरपडे (वय 66, रा. चौथी स्कीम, पेठे विद्यालयाजवळ, त्रिमूर्ती चौक, सिडको, नाशिक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, पत्नी, तिचा मित्र भूषण शिंपी (रा. सिद्धिविनायक अपार्टमेंट, सायखेडकर हॉस्पिटलजवळ, त्रिमूर्ती चौक, सिडको) आणि मेव्हणा विकी दळवी (रा. चौथी स्कीम, त्रिमूर्ती चौक, सिडको) यांनी संगनमत करून घरातील सोन्याचे दागिने लंपास केल्याचा आरोप आहे.
फिर्यादीनुसार पत्नी, तिचा मित्र आणि मेव्हण्याने फिर्यादीच्या राहत्या घरातून त्यांच्या संमतीशिवाय दागिने काढून नेले. त्यानंतर हे दागिने भूषण शिंपी याच्या नावावर बँकेत तसेच सोनाराकडे गहाण ठेवल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये सुमारे 9.090 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 18.660 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (वाटी-मणीसह), सोन्याचे डोरले आणि 18.634 ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स यांचा समावेश आहे.
या सर्व दागिन्यांचे एकूण वजन 46.384 ग्रॅम असून, त्यांची अंदाजे किंमत सहा लाख रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Wife, with friend’s help, steals husband’s jewellery.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *