फडणवीसांचा ‘हुंकार’ : मुंबईत भाजपचा ‘जनआक्रोश’
मुंबई : विशेष प्रतिनिधी
महिलांची सुरक्षा आणि सन्मान ही केवळ घोषणा नसून आमची वचनबद्धता आहे. भगिनींवर अन्याय करणार्या प्रवृत्तींना ठेचून काढल्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. मुंबईत भाजपच्या ‘जनआक्रोश’ मोर्चानंतर पार पडलेल्या संमेलनाला संबोधित करताना फडणवीस यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. केंद्र व राज्य सरकारच्या महिला कल्याणकारी योजनांचा पाढा वाचत त्यांनी विरोधकांवरही जोरदार टीका केली.
राजधानी मुंबईतील राजकीय वातावरण मंगळवारी महिलांच्या प्रश्नांवरून चांगलेच तापले. वरळी येथील एनएससीआय डोममध्ये भाजपच्या वतीने भव्य ‘जनआक्रोश महिला संमेलना’चे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या माध्यमातून भाजपने आगामी निवडणुकीपूर्वी मोठे शक्तिप्रदर्शन केले असले, तरी महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या (शिंदे गट) अनुपस्थितीमुळे या एकजुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महायुतीचा कार्यक्रम असूनही शिवसेनेच्या महिला आघाडीची दांडी हा चर्चेचा विषय ठरला आहे.
महिलांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी भाजपने भव्य ’जनआक्रोश’ मोर्चा व संमेलनाचे आयोजन केले होते. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात आवाज उठवणे आणि महिला शक्तीला संघटित करणे, हा यामागील मुख्य उद्देश होता. या संमेलनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित करताना अत्यंत आक्रमक भूमिका मांडली. आगामी राजकीय संघर्षासाठी महिला कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
राजकीय अर्थ आणि संभ्रम
वरळी हा परिसर आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असल्याने येथे भाजपने मुद्दाम संमेलन आयोजित केले होते. मात्र, महायुतीमधील दोन प्रमुख पक्षांमध्ये असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे हा ‘जन आक्रोश’ केवळ भाजपपुरताच मर्यादित राहिला की काय? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही मित्रपक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी फिरवलेली पाठ हे आगामी काळात जागावाटप किंवा इतर अंतर्गत मतभेदांचे संकेत असू शकतात, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. एकूणच, वरळीतील हे संमेलन गर्दीच्या दृष्टीने यशस्वी ठरले असले, तरी महायुतीमधील ’शिस्त’ आणि ’समन्वय’ यावर या निमित्ताने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला असला, तरी शिवसेनेच्या अनुपस्थितीमुळे महायुतीच्या एकजुटीचे चित्र धूसर झाले आहे.
शिवसेनेची अनुपस्थिती ठरली चर्चेचा विषय
मुख्यमंत्री आणि महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी हा मोर्चा ’महायुती’चा असेल, असे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ भाजपचेच चेहरे आणि झेंडे या ठिकाणी पाहायला मिळाले. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकार्यांनी या संमेलनाकडे पाठ फिरवली. पक्षाकडून आम्हाला या मोर्चात सहभागी होण्याबाबत कोणतेही अधिकृत आदेश प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे आम्ही उपस्थित राहिलो नाही, असे स्पष्टीकरण महिला आघाडीच्या सूत्रांनी दिले. केवळ महिला आघाडीच नाही, तर शिवसेनेचे (शिंदे गट) दिग्गज नेते आणि मंत्र्यांचीही या कार्यक्रमात अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.
Will fight for the dignity of women