गणेशोत्सवाला प्रारंभ : घरोघरी, आस्थापनांत, सार्वजनिक ठिकाणी प्रतिष्ठापना
नाशिक : प्रतिनिधी
ढोल-ताशाच्या गजरात गणरायाचे मंगलमय वातावरणात घरोघरी लाडक्या गणरायाचे आगमन झाले. त्याचप्रमाणे विविध सरकारी, निमसरकारी कार्यालयांत गणपती बाप्पा विराजमान झाले. दहा दिवस चालणार्या या उत्सवामुळे चैतन्यमय वातावरण निर्माण झाले असून,
सार्वजनिक गणेश मंडळाच्या बाप्पाचेही धूमधडाक्यात स्वागत करण्यात आले असून, शहरात विविध ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळाचे बाप्पा विराजमान झाले आहेत. शहरात दिवसभर मंडळाच्या गणपतीची मिरवणूक काढत बाप्पा विराजमान झाले.
विधिवत पूजा आणि नैवेद्य दाखवत बाप्पाचे मनोभावे स्वागत करण्यात आले. गणपतीच्या स्वागतासाठी अबालवृध्दांनी जय्यत तयारी केली होती. बच्चेकंपनीचा लाडका बाप्पा येणार असल्याने चिमुकल्यांचीही बाप्पाच्या स्वागतासाठी लगबग सुरू होती. आता गणरायाचे आगमन तर झाले आहे मात्र बाप्पाची दहा दिवस सेवा करण्यासाठी भक्तगण तयारी करत आहे. बाप्पाच्या आरतीसाठी रोज लागणार्या प्रसादासाठी भाविकांनी नियोजन करून ठेवले आहे. गणपती आगमनाच्या दिवशीही पावसाची रिपरिप सुरू असल्याने बाप्पाच्या स्वागतात काही प्रमाणात विघ्न निर्माण झाले.मात्र भाविकांनी पावसातही मोठ्या जल्लोषात उत्साहात बाप्पाचे स्वागत करत मनोभावे आराधना केली.शुभ मुहूर्तासोबतच दिवसभर बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. आज दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन होणार असून यासाठी महानगर पालिका व पोलीस प्रशासन सज्ज आहे.