’सकलसौभाग्य वज्रचुडेमंडित सौ…’ पूर्वीच्या काळी लेकी, बाळी, सुना किंवा कुठल्याही सौभाग्य स्त्रीचा उल्लेख या पद्धतीने होत असे. बाबासाहेब पुरंदरे लिखित ’जाणता राजा’मध्ये सोयराबाई रात्री-अपरात्री राजे मोहिमेवर असताना बांगड्या किणकिणतात त्यावेळेला त्यांचा वाईट बातमीच्या भीतीने ऊर कसा दडपतो, याचे वर्णन करतात. पण ज्यावेळेला शिवराय त्यांच्या प्रथम पत्नीला सईबाईंना विचारतात, ’आम्ही तळहातावर शिर घेऊन इतक्या मोहिमांवर जातो, लढाईवर जातो तुम्हाला भीती नाही वाटत?’ त्यावेळेला सईबाई अभिमानाने उत्तरतात ’मग आमचे हे वज्रचुडेमंडित हात कशासाठी आहेत?’ सईबाईंची त्यांच्या वज्रचुड्यांवर इतकी अढळ श्रद्धा होती की, त्यांच्या हयातीत राजांना कधीही पराभवाची चिंताच वाटली नाही. नराच्या मागची नारायणी शक्ती खरेतर यालाच म्हणतात.
खरोखर ’बाई आणि बांगडी’ यांच्यात एक अतूट नाते आहे. जशा नाण्याच्या दोन बाजू. कुठलाही सण असो वा विवाह समारंभ कोपर्यावरच्या टपरीतल्या बांगडीवाल्यापासून ते भल्यामोठ्या मॉलमध्ये बांगडी खरेदी-विक्रीला ऊत येतो. विविधरंगी, विविधढंगी, विविध प्रकारच्या गोल गरगरीत बांगड्या हातगाडीवर, दुकानातल्या रॅकवर दिमाखाने विसावलेल्या असतात. बांगड्या खरेदी करून पर्समध्ये टाकणार्या आमच्यासारख्या, तसेच दुकानदारापुढे हात पुढे करत त्याच्याकडून ताई, माई, आक्का म्हणवून हवापाण्याच्या गप्पांपासून, घरगुती, सणावाराच्या ते बदलत्या काळाच्या गप्पा मारत भय्या, दादाकडून हातातल्या असतील तर सोन्याच्या पाटल्या बांगड्यांमधून किंवा चांदीच्या कड्यामधून डझन डझन हिरव्यागार ते लाल गुलाबी बांगड्या गुंफत बसलेल्या साक्षात लक्ष्मी खेड्याखेड्यांत, गावागावांत, शहराशहरांत ते महानगरातही आढळतात. एरवी परपुरुषाचा स्पर्श अंगावर पाल पडल्यासारखे झटकणारी स्त्रीदेखील बांगडीवाल्याच्या हातून आपल्या दोन्ही हातांत अभिमानाने बांगड्या भरून नंतर त्या चुड्याला भक्तिभावाने नमस्कार करतात. आणि सौभाग्य चुड्यात बार्गेनिंग करणे चांगले नसते म्हणून तो मागेल तितके पैसे देऊनही टाकतात. एरवी घरात हातखर्चासाठी पैसे देताना मागेपुढे बघणारे पुरुष बांगड्यांसाठी मात्र सढळ हाताने खर्च करताना दिसतात. सहलीहून आईला, बहिणींना बांगड्या आणणारा श्रावणबाळ तर पत्नीसाठी आणणारा आदर्श रोमँटिक पती असतो. भावजयीने वन्संना बांगड्या भरल्यास तो वन्संचा अधिकार आणि भावजयीचे कर्तव्य असते. पण लग्नकार्यातही भावजयीला बांगड्या भरण्यासाठी वन्सं जनरली विसरतातच, अगदी ओटी आहेर तर आवर्जून विसरतात आणि जर भरले तर भावजयीवर ते साताजन्माचे उपकारच असतात.
बांगड्यांच्या रंगावरून, चकाकीवरून, स्त्रीच्या स्वभावाचा आणि सुखवस्तूपणाचा अंदाज यावा. स्त्रीच्या बांगड्यांचा नाद किताही मोहक असला तरी तो किणकिणाट, तो खळखळाट या चढत्या भाजणीनुसार स्त्रीच्या स्वभावाची कल्पना जरूर येते. स्वतःच्या अपत्यांच्या, नातवंडांच्या, पतवंडांच्या पाठीवरून हात फिरवताना बांगड्यांचा नाद ऐकून बालगोपाळांचा थकवा कुठल्याकुठे पळतो, कणा ताठ होतो आणि आई, आजी, आत्या, मावशीच्या कुशीत शिरून आपोआप मन मोकळे करावेसे वाटते. दिवसभरातून रामसेंचा हॉरर पिक्चर बघितल्यास, एखाद्या बंड्या, ताई, माई, आक्का यांच्याकडून थरकाप उडवणार्या गोष्टी ऐकल्यास किंवा प्रचंड खेळून आलेल्या थकव्यानंतर अस्वस्थ झोपेचा सुकून म्हणजे आईने अंगावर हात फिरवताच तिचा मायेचा स्पर्श आणि तिच्या हातातल्या बांगड्यांचा किणकिणाट. त्याच्यामुळे अंथरूण ओले होण्याची शक्यताही कमी असते.
नवरा-बायकोच्या नात्यात तर या बांगड्यांचे विशेष महत्त्व आहे. भांडणात खळखळाट वाढतो तर प्रणयात किणकिणाट. जेवणाच्या ताटात वाढताना बांगड्यांच्या सुमधुर नादासोबत ’अन्न हे पूर्णब्रह्म’. तिखट- मिठाकडे दुर्लक्ष होत चार घास पोटात जास्तच उतरतात. वामकुक्षीनंतर सासूबाईच्या चहाची वेळ झाली, हे चाणाक्ष सूनबाई त्यांच्या बांगड्यांच्या आवाजावरून ओळखतात. पेपरमध्ये डोकं खुपसून बसलेला घरातील पुरुषवर्ग समोर चहा आला आहे हे बांगड्यांच्या आवाजावरून ओळखतो.
बांगड्यांच्या किणकिणाटाच्या नादात स्त्रीकर्तव्यात स्वतःस समर्पित करणारी स्त्री मात्र अंगात चंडीकाली संचारल्यास पदरासोबत बांगड्याही हातात मागे खोचून उभी राहते. कपाळावर घाम साचलेला असतांना उलट्या हाताने घाम पुसत ती स्त्री कपाळ हातासोबत बांगड्यांवरही मायेचा पदर फिरवते. पूर्वीच्या काळात जात्यावर धान्य दळणारी स्त्री, घर अंगण शेणाने सावरून लख्ख करणारी स्त्री, शेणाच्या गोवर्या तयार करून जमिनीवर थापणारी स्त्री, रोजचे कपडे दगडावर घासून रगडून आपटून धुणारी स्त्री, चुलीतल्या राखेने तांब्या पितळेचे भांडे खसाखस घासणारी स्त्री, सरपण फोडणारी स्त्री, काठवटवर पन्नास-साठ भाकर्या थापून चुलीवरल्या तव्यावर भाजणारी स्त्री, ते संसार रामरगाड्याचा ताण असह्य झाल्यास पोरांच्या पाठीत सणसणीत धपाटा घालणारी नंतर त्यांच धपाट्यावर हळुवार तेल चोळणारी स्त्री हातातल्या चुड्याला मात्र विलक्षण जपायची. एकेका हातात अठरा ते चोवीस बांगड्यांचा चुडा या धबडग्यातही वर्षभरही व्यवस्थित टिकायचा. लग्नकार्यात तर बांगड्यांचा विशेष मान. एका बाजूला हळदीचा कार्यक्रम सुरू असतांना दुसरीकडे कासार किंवा कासारीणताईंंच्या अवतीभोवती वर्हाडणींचा गराडा असतो. मानापानाप्रमाणे बांगड्या भरण्यासाठी नंबर लागतात. आधी नवरी, वरमाय, वधुमाय, करवल्या नंतर इतर बायकांचे नंबर त्यावरूनही मानपान, रुसवेफुगवे, शकुन अपशकुन, सुखाचे, अभिमानाचे, दुःखाचे भरते, विविध स्त्री आणि काही अंशी पुरुषांच्याही भावभावनांचे विभ्रम अनुभवायला मिळतात. सणावाराप्रमाणे समारंभांप्रमाणे बांगड्यांचे रंग बदलतात. हल्ली संक्रांतीला काळ्या बांगड्या वेगवेगळ्या रंगांच्या बांगड्यांमध्ये गुंफायची फॅशन आहे. विठोबाचा बुक्का सोडून इतर वेळी काळा रंग अपशकुनी म्हणून हिणवताना फॅशन म्हणून मानवाला काळ्या रंगाचेच जास्त आकर्षण आहे. त्याला तर बांगड्याही अपवाद नाहीत. काळा रंग संक्रांतीसाठी फॅशन सिम्बॉल बनवताना ते पानिपतच्या पराभवाचे प्रतिक आहे हे किती जणींना माहीत आहे, याची शंकाच आहे. बाकी ब्लॅक शोज, ब्लॅक रॅम्प वॉक, ’पार्टीज इन ब्लॅक सेलिब्रेशन’च्या मागे पानिपतच्या ब्लॅकडेची शोकांतिका आहे. पानिपतच्या युद्धाचे वर्णनही असेच तर केले आहे, ’लाखभर बांगडी फुटली’
दसरा-दिवाळीच्या रंगीबेरंगी तर समारंभात हिरव्यागार चुडे ल्यालेल्या नवर्या, करवल्या या कार्याची खरी शोभा असते. (क्रमश:)
मुलीचा जन्म झाल्यास ’घरात चोळी-बांगडीचा आहेर आला’ असेच म्हटले जायचे. किंवा स्त्री अहेवपणी गेल्यास भरल्या चुड्यानिशी निजधामास गेली, असे म्हणण्याच्या रिवाज होता. माहेरीदेखील मुलींना समज देताना आईवडील ’माहेराशी फक्त चोळीबांगडीपुरताच संबंध ठेवा,’ असे सांगितले जायचे. इतर असंख्य क्षेत्रात जसे असंख्य आविष्कार झाले तसे बांगडी या क्षेत्रातही अगणित आविष्कार झाले. काचेच्या, प्लास्टिकच्या, रंगीबेरंगी, लाकडाच्या विविध धातूंच्या ब्लॅकमेटल, सिल्व्हर मेटल, कॉपर, प्लेन ते डिझायनर कधी एकदम सॉफ्ट फिनिशिंग ते कधी साडीचा / ड्रेसचा / ओढणीचा धागा ओढून स्त्रीच्या कपड्यांचा आणि मुडचा सत्यानाश करणार्या, भरल्या खिशाला परवडणार्या सोन्या, चांदी, अस्सल मोत्याच्या बांगड्या ते ओसंडून वाहणार्या खिशासाठी प्लॅटिनम, हिर्याच्या. परंपरेप्रमाणे आणि डिझाइनप्रमाणे त्या सोन्याच्या बांगड्यांचे तरी किती प्रकार अबब! पाटल्या, बांगड्या, तोडे, शिंदेशाही तोडे, पेशवाई, कलकत्ती, गोठ, बिलवर, पिछुड्या, दंडातल्या वाक्या, मॉडर्न ब्रेसलेट, अजूनही असतील.
हल्ली बांगड्यांच्या गोलाईने देखील त्रिकोण, चौकोन, पंचकोन, षटकोन, अष्टकोन, अंडाकृती, सर्पिलाकार, मोत्यांचे लोंबते घोस इत्यादी धारण केले आहेत.
आणि त्यात नजाकतीने गुंफलेले रंगीबेरंगी मोती ते जडवलेले मोती, पोवळे, पाचु, विविधरंगी अमेरिकन डायमंड्स ते हिरे. कधीकधी स्वतःचे किंवा नवर्याचे नाव सुद्धा. हल्ली साध्या बांगड्यांमध्ये रेशमी धागे गुंडाळून तयार होणार्या सिल्कच्या बांगड्या, राजस्थानी बांधणीच्या, बंगालच्या लालपिवळ्या, आणि हस्तीदंती, भारतातल्या विविध राज्यांमधल्या विविधरंगी, विविधढंगी, भारताबाहेरही अनेक देशांमध्ये विविध प्रकारच्या, वनकन्यांनी पाने फुले मनगटाभोवती गुंडाळून बनवलेल्या आकर्षक नैसर्गिक बांगड्या. लग्नात हौसेने मेहंदीच्या कोनने मनगटावर रेखलेली बांगड्यांची डिझाईन, हळदी समारंभात पळस आणि चाफ्याची फुले एकत्र गुंफुन केलेल्या मनगट्या, किंवा पिवळी आणि पांढरी शेवंती गुलाबपाकळ्यांसह गुंफुन केलेले फुलांचे ब्रेसलेट नयनरम्य शब्दाची व्याख्याच सांगते.
पूर्वी कासाराच्या दुकानातल्या कपाटातून हातात चढणार्या बांगड्या हल्ली गृहिणींच्या कपाटातला बराचसा भाग अडवू लागल्या आहेत. प्रवासी बॅगेत पाऊच किंवा छोटीशी पेटी इतर मेकअपच्या सामानासोबत बांगड्या ही स्वतःच्या उदरात दडवून बसते. कपाटात प्रत्येक साडीवर प्रत्येक ड्रेस वर मॅचिंग बांगड्या स्त्रीचा कल्पक मेंदू निवडत असतो. त्यापेक्षा दुकानदार कल्पकतेने विविधरंगी बांगड्यांचे सेट बनवून स्त्रीच्या माथी सॉरी साडीवर ड्रेसवर मारत असतो. आणि पैशांचा खिसा हलका करत असतो. पाच-सहा वर्षांपूर्वी जेव्हा मोबाईलचे फॅड बोकाळले नव्हते तेव्हा डाव्या हातावर मनगटी घड्याळ आणि उजव्या हातात भरगच्च बांगड्या शोभायच्या पण मोबाईल आले आणि बांगड्यांनी दोन्ही हात परत बळकावले. याच बांगड्यांनी साहित्यातही छान प्रवेश केला आहे. कितीतरी मराठी म्हणी या बांगड्यांनी सजल्या आहेत. ’हाताच्या काकणाला आरसा कशाला?’, ’नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा’ इत्यादी. अनेक साहित्यिकांनी बांगड्यांवर कादंबर्याही लिहिल्यात ’वहिनींच्या बांगड्या’, ’चुडीवाला’, वगैरे ज्याच्यावर बॉलीवूडमध्ये छान पिक्चर देखील निघाले आहेत. हातातल्या कंकणाची झेप तर अवकाशातही आहे सूर्यग्रहण कंकणाकृती असते. माझ्या भोळ्या भाबड्या माहेरच्या सयाबहिणी त्याला काकण सूर्यग्रहण किंवा बांगडीतला सूर्यदेव म्हणतात. बाकी पुरुषी अहंकार बांगडीकडे स्त्रीधन म्हणून जरी बघत असला तरी तिच्या आकार प्रकारचे कडे मात्र आवर्जून हातात घालतात.
नसले तर पुजेच्या नावाखली लाल पिवळे धागे तरी बांधतात. शीख बांधवांच्या हातातल्या कड्यांचे आकर्षण समस्त पुरुष वर्गाला आहे. राजस्थानी बांधवही हातात अभिमानाने कडे घालतातच. सोन्या चांदीच्या विविध डिझायनर पोहोची तर पुर्वापार प्रसिद्ध आहेत. हल्ली बिनहुंड्याच्या लग्नात नवरदेव पोहोची, सोन्याची चेन सासुरवाडीकडून उकळत असतो. पूर्वी महाराष्ट्रातही मर्द मावळे,
’पायात तोडा, हातात कडा
रूप मर्दाचे छान गं,
हाती तलवार छातीवर ढाल
मर्द मावळ्याची शान गं …..’
याच सगळ्याची नक्कल हल्लीची दीड इंच छाती वाली पोरंटोरं करत आहेत. हातात कडा ठीक आहे पण पायात तोड्याच्या ऐवजी काळ्या करगोट्याचे अँकलेट आणि कानाच्या पाळीला खड्याची टिकली लावत काड्यागत बांबूसारख्या पायाची रुबाबात पाऊले टाकत मिरवतात आणि माझ्या हातातल्या छडीला टरकतात. ल्युमिनियम अथवा कॉपरचे कडे ज्यावर जय माता दी किंवा जय भोले लिहिलेले असते, किंवा दोन्ही धातुंच्या तारा डीएनए आकारात गुंफत कडे बनवले जाते. हेच दोन्ही धातुंचे कडे घेऊन डीएनए चा आकार शिकवल्यावर मुले इतकी खुश झाली की माझ्या काठीलाही घाबरेनाशी झाली. आणि दुसर्याच दिवशी यच्चयावत पटसंख्या हातात आनंदाने कडे घालून आली. कपाळावर हात लावला तो अजुनही निघालेला नाही.
बॉलीवूडलाही बांगड्यांनी छान आकर्षित केलेले आहे. साड्यांवर मॅचिंग बांगड्यांची प्रथा बॉलिवूडनेच जनमानसात सॉरी जनबायकात रुजवली आणि खिशाला बर्यापैकी कात्री लागली. रेखा श्रीदेवी जयाप्रदा हेमामालिनी आणि असंख्य अशा अभिनेत्रींचा बांगडीसेन्स आणि बांगडीसिन बघून हृदयात किनकिनाट होतो. हाताच्या काकणाला आरसा कशाला? असे म्हटले तरी छान मेकअप झाल्यावर हातात बांगड्या घालताना एक तिरपा कटाक्ष आरशाकडे जातोच. आणि बांगड्यांनी सजलेले हात आवर्जून आरशात बघितलेच जातात. हाताच्या कोपरापर्यंत लालभडक मेहंदी रेखलेल्या हातावर हळकुंड जोडी आणि हिरवागार चुडा कित्येक दुकानदारांच्या पाट्या सजवतात. दृश्यही नयनरम्य आहे. ’वहिनींच्या बांगड्या’ या कादंबरीवरून मराठी चित्रपट तर निघालाच पण हिंदीतही ’भाभी की चुडिया’ बॉक्स ऑफिसवर हिट झाला. मराठी/ हिंदी गाणी सुद्धा कितीतरी हिट आहेत, ’मेरे हाथोंमे नौ नौ चुडिया रे’, ’चुडी मजा न देगी कंगन मजा न देगा’, ’तेरे हातो में पहनाके चुडिया’, ’चुडी नही ये मेरा दिल है’ वगैरे वगैरे या गाण्यात देवानंदने हिरॉईनसाठी इतक्या बांगड्या आणल्या की सर्व प्रेयसी आणि नवपरिणीत वधु त्यांच्या नवर्यांवर रूसल्या. त्यात अस्मादिकही होते. कटकट ऐकुन शेवटी मिस्टर म्हणाले त्याला या सर्व बांगड्या दिग्दर्शकाने दिल्या आहेत. तुला हव्या असतील तर असा दिग्दर्शक शोध मी पण देतो’.
’सुज्ञ वाचकांनी मराठी गाणी ओळखावी’
अशा बांगडीच्या मागे अपशकुनांचीही पीडा आहेच. हातातली बांगडी कचकन फुटताच गरती स्त्री आगामी संकटांच्या कल्पनेनेच गर्भगळीत होते. प्रेमरोग मध्ये नवपरिणीत पद्मिणी कोल्हापुरेच्या हातातील बांगडी पिचायची आणि तिच्या नवर्याच्या क्सिडेंटची एकच गाठ पडली होती. एखाद्या स्त्रीचा पती स्वर्गवासी झाल्यावर त्या बिचार्या बांगडीचा काय दोष! हेच कळत नाही. एक तर त्या कचाकचा तोडल्या जातात. वरून ज्या दगडाने तोडली त्यालाही बिचार्याला बांगड्यांच्या तुकड्यांसारखे लांबवर फेकून देतात. वरून अस्पृश्या सारखे बघतात. अरे त्याने तर तुमच्याच इच्छेने आणि तथाकथित परंपरांनुसार बांगड्या तोडल्या ना! पण त्याला कुत्रा देखील शिवत नाही. जन्म मरण तर कोणाच्याही हातात नाही पण नशिबात मात्र प्रत्येकाच्या असतेच असते. त्यात त्या बिचार्या बांगड्यांचा काय दोष? बांगड्यांच्या किनकिनाटाचा मोह तर रामसेंनाही सुटलेला नाही. अंधार्या रात्री पावसाळी हवेत, वारा सुं सूं वाहतोय. सुनसान रस्त्यावर त्यांच्या सफेद फडफडणार्या वस्त्रधारी, लांबलचक मोकळ्या झिप्र्यांच्या हिरोईनच्या उलट्या पावलांचा सपसप, पैंजणांचा छम छम आणि बांगड्यांचा खळखळ आवाज घुमतोय. आणि हिरोच्या गाडीत अचानक वाकून लिफ्ट मागतोय. गाडीत बसल्यावर अप्सरागत (मुनमुनसेनगत) चेहरा अचानक विद्रुप हडळीगत कन्हर्ट होतो. बाकी यांच्या हडळी कोणत्या कासाराकडून वा हातगाडीवाल्याकडून काचेच्या बांगड्या विकत घेतात कोण जाणे?
देवीला अठरा बांगड्यांचाच चुडा का चढवतात? हा प्रश्न मी माहूर ते कोल्हापूर गेली अठरा वर्ष विचारत फिरते आहे. शेवटी माझ्याच माय माहेरातल्या आरामतटावरच्या साडेचार फुटी संतोषी माता राऊळातल्या बापु भटजींनी सांगितले शरीरातल्या श्वसनापासून पचना पर्यंतच्या अठरा अत्यंतिक महत्त्वाच्या आणि जीवन संरक्षक सकारात्मक उर्जादायक शारीरिक क्रियांचे निदर्शक म्हणजे अठरा बांगड्या, किती सोपे होते! माहेरी यशवंत देव पाठीराखा तर आहेच पण कित्येक वेळा ज्ञानाचा खजिना माता-पित्यांसोबतच माहेराकडूनच मिळतो. माझ्या हातातल्या मोबाईल कडे बघत त्यांनी जगन्मातेच्या प्रत्येक करांचे वर्णन करत माझ्या हातातल्या बांगड्या देवीला चढवत शेवटी मला म्हटले, ’आता तुझ्या मोबाईलसाठी देवीचा एकही हात रिकामा नाही. ’मनोमन खजील होणे,’ या वाक्प्रचाराचा व्यवस्थित प्रत्यय आला. स्त्रीचा अत्यंतिक अभिमान ’बाई आणि बांगडी’ या एकाच नाण्याच्या दोन बाजू असताना त्या बांगडीला कोणी हिणकस ठरवले तर सहन होत नाही. एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये एका अत्यंत सक्षम महिला अधिकार्याने पुरुष सहकार्यांना म्हटले, ’कामे होत नसतील तर हातात बांगड्या भरा’ मनोमन खूप वाईट वाटले बाईनेच बांगडीला कमी लेखले. डोळ्यापुढे अठरा सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे जगन्मातेचे करकमल आले. पुरुषांना हातात बांगड्या भरा असे म्हटल्यावर त्यांची अस्मिता दुखावली जाते म्हणे. पण पुरुषी अहंकार बांगडी धारकांना कमी लेखत कामचोरपणा पण करतांना दिसतो.
काही दिवसांपूर्वी एका महिला परिसंवादात मला एक प्रश्न विचारण्यात आला, ’स्त्रीसक्षमीकरणासाठी सरकारी पातळीवर काय प्रयत्न व्हायला हवे असे तुम्हाला वाटते’, मोठ्या अभिमानाने मी उत्तर दिले होते, ’जी मुळातच सक्षम आहे तिला तुम्ही आणखी काय सक्षम बनवणार! शेतकर्यांनी किंवा इतरही परिस्थितीपिडीतांनी आत्महत्या केल्यावर हातातील बांगड्या मनगटामागे सारत या सर्व शेतकरी मर्दानी आणि इतरही चंडीकांनी संकटांवर तुटून पडत संसार सावरले, नवर्याचेच आई वडिल आणि मुलेबाळे जी त्याची जबाबदारी होती, जी टाकुन देऊन भ्याडपणाने त्याने आत्महत्या केली ती जबाबदारी सक्षमपणे सांभाळली कोणी शेती केली, कोणी पशुपालन, दुधदुभत्याचा व्यवसाय, तर कोणी ट्रक, टॅक्सी, रिक्शा चालवली, हातगाडीवर भाज्या विकल्या अगदी नगरपालिकेच्या झाडुखात्यात नौकर्याही केल्या पण चुड्याला व्यवस्थित जपले. बांगडी घालणारा हात अत्यंत सक्षम आहे. पण बांगडी भरण्याच्या नुसत्या कल्पनेनेच तो पुरुष पळपुटा आणि भ्याड आहे. त्यांनी या ’वज्रचुडे मंडित सक्षम’ हातांकडून जरूर धडे घ्यावे.
Woman and bangle