नांदगावमध्ये शिक्षण विभागाचा निषेध करत केले विषप्राशन
मनमाड : प्रतिनिधी
कोणतेही कारण नसताना कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ नांदगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील शालेय पोषण आहार शिजवणार्या महिला कर्मचारी संगीता सोनवणे यांनी शिक्षण विभागाच्या कारभाराचा निषेध करत विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
नांदगाव नगरपालिकेच्या शाळेत पोषण आहार शिजवणार्या महिलांना अचानक कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय कामावरून कमी करण्यात आले होते. या अन्यायाविरोधात संगीता सोनवणे यांनी आत्मदहनाचा इशारा
दिला होता.
त्यानुसार आज सर्व बाधित महिला कर्मचारी शिवस्फूर्ती मैदानावर एकत्र जमल्या होत्या. मात्र, न्याय देण्याऐवजी गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी आणि शिक्षण विभागाच्या अधिकार्यांनी “आम्ही चौकशी समिती नेमू” अशी उडवाउडवीची उत्तरे दिली.
सोनवणे यांची प्रकृती चिंताजनक
अधिकार्यांच्या या उदासीन भूमिकेमुळे संतापलेल्या संगीता सोनवणे यांनी अखेर विषप्राशन केले. ऐनवेळी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने पोलिसांनी तातडीने त्यांना आपल्या गाडीतून शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती अधिक खालावल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलविण्यात आले असून, त्यांची स्थिती चिंताजनक आहे. या घटनेनंतर नांदगावमधील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले असून, दोषी अधिकार्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
व्हीआयपींना पत्र देऊनही दुर्लक्ष
या अन्यायाविरोधात आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ विभागांना लेखी पत्रे दिली होती. परंतु, या नेत्यांनी आणि प्रशासनाने आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यांच्याच हलगर्जीपणामुळे आज हे टोकाचे पाऊल उचलावे लागले, असे आंदोलक महिला कर्मचार्यांनी स्पष्ट केले.
Woman who cooks nutritious meals attempts suicide