ठराव तत्काळ रद्द करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या सीईओंना निवेदन
दिंडोरी : प्रतिनिधी
तालुक्यातील ननाशी येथे 12 ऑगस्ट 2022 रोजी गावात वाइन शॉप (दारूचे दुकान) सुरू करण्याबाबतचा संमत केलेला ठराव तात्काळ रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी ननाशीतील महिलावर्ग आक्रमक झाला आहे. महिलांनी प्रथम दिंडोरी पंचायत समितीकडे निवेदन सादर केले आणि त्यानंतर त्याबाबत खुलासा करत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांची भेट घेत त्यांना लेखी निवेदन दिले. हा नियमबाह्य आणि वादग्रस्त ठराव तत्काळ रद्द करावा, अशी मागणी महिलांनी केली.
निवेदनात नमूद केल्यानुसार, ग्रामपंचायत प्रशासनाने हा वादग्रस्त ठराव मंजूर करताना गावातील नागरिक आणि विशेषतः महिलांना पूर्णपणे अंधारात ठेवले. ग्रामसभेत याविषयी कोणतीही पूर्वकल्पना किंवा पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. नागरिकांचे आक्षेप किंवा हरकती न मागवता अत्यंत घाईघाईने आणि नियमबाह्य पद्धतीने हा ठराव लादण्यात आला आहे, असा गंभीर आरोप महिलांनी केला आहे. या आंदोलनात आणि निवेदन देण्याच्या वेळी ननाशीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या निवेदनावर सुमित्रा धुळे, लीला वाघमारे, हेमलता वाघमारे, रंजना गायकवाड, रखमा सिंगाडे, पारूबाई ढबाळे, निशा भोंहवे, हेमलता गांगोडे, शोभा शेखरे, भोरूबाई वाघमारे, जिजाबाई वाघमारे, सुमन वाघमारे, यशोदा शार्दुल, मैना बोके, इंदूबाई गायकवाड, राधा वाघमारे, चंद्रकला ढबाळे, कविता मनोरे, नर्मदा मोरे, यशोदा गांगोडे, मीराबाई वाघमारे, लक्ष्मी वाघमारे, अनुसया पवार, निर्मला वाघमारे, कल्पना वालझाडे, निर्मला गांगोडे यांच्यासह अनेक महिलांच्या स्वाक्षर्या आहेत.
चौकशी, शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी
ग्रामस्थांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे 12 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात आलेल्या या संशयास्पद ठरावाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. चौकशीत नियमबाह्य किंवा गैरप्रकार आढळल्यास संबंधित दोषी ग्रामसेवकावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी आणि वाइन शॉपचा ठराव तातडीने रद्द करावा, अशी मागणी लावून धरण्यात
आली आहे.
सामाजिक वातावरण बिघडण्याची भीती
गावात वाइन शॉप सुरू झाल्यास गावातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येईल तसेच तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या गर्तेत ढकलली जाऊन त्यांचे भविष्य धोक्यात येईल, अशी तीव्र भावना महिलांनी व्यक्त केली. मात्र, ग्रामस्थांना विश्वासात न घेता घेतलेल्या या निर्णयामागे नेमके गौडबंगाल काय? असा संतप्त सवाल महिलावर्गाकडून उपस्थित केला जात आहे.
क्रीडांगण सपाटीकरणात 65 हजारांचा भ्रष्टाचार?
ननाशी येथील क्रीडांगण सपाटीकरणाच्या कामात 65,000 रुपयांचा मोठा भ्रष्टाचार व गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप रमाकांत शार्दुल यांनी केला आहे. प्रत्यक्ष काम न करताच खोटी बिले तयार करून शासकीय निधी लाटण्यात आल्याचा दावा अर्जात केला आहे. याप्रकरणी ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराची त्वरित व सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करावी आणि अपहार झालेली रक्कम वसूल करावी, अशी मागणी गटविकास अधिकार्यांकडे केली आहे.
Women take a firm stand against the Nanashit wine shop.