नाशिक : प्रतिनिधी
ठक्कर बझार बसस्थानकात शेवटच्या श्रावणी सोमवारच्या झालेल्या गर्दीत बसच्या चाकाखाली चिरडून एका सतरावर्षीय युवतीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. आकांक्षा रामभाऊ शेलार असे या युवतीचे नाव आहे. याबाबत सरकारवाडा पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. रविवारी (दि.6) शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरला जाणार्या भाविकांची ठक्कर बझार बसस्थानकावर मोठी गर्दी झाली होती. या गर्दीत प्रवाशांनी भरलेली बस निघाली. मात्र, चालकाला अंदाज न आल्याने आकांशा शेलार ही बसच्या चाकाखाली आल्याने चिरडली गेली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. श्रावणातील शेवटच्या सोमवारी देखील भाविक त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरीची फेरी मारतात, त्यामुळे रविवारी मोठ्या प्रमाणात भाविक आले होते. याच गर्दीमुळे आकांक्षाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिक तपास सरकारवाडा पोलीस करीत आहेत.
Young woman crushed to death under bus at Thakkar Bazaar station.