लखमापूरला वृद्धेची हातपाय बांधून पाण्यात फेकून हत्या

आरोपीचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान

दिंडोरी/वणी : प्रतिनिधी
तालुक्यातील लखमापूर येथे सत्तरवर्षीय वृद्ध महिलेचा संशयास्पद परिस्थितीत खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान वणी पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
मंदाकिनी हरिभाऊ सोनवणे (वय 70, रा. लखमापूर, ता. दिंडोरी) असे मृत महिलेचे नाव आहे. 4 सप्टेंबरला सायंकाळी लखमापूर गावातील घराजवळील परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. अज्ञात व्यक्तीने या वृद्ध महिलेच्या तोंडावर कापड बांधून, हातपाय बांधून तिला पाण्यात टाकून हत्या केल्याचे पोलीस तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मदेव शेलके व सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. वृद्ध महिलेचा खून नेमका कोणत्या कारणातून झाला, यामागे कोणाचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस विविध मार्गाने तपास करत असून संशयितांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, या धक्कादायक घटनेमुळे लखमापूरसह परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी आरोपीला तातडीने जेरबंद करून खुनाचा उलगडा करावा, अशी मागणी होत आहे.

Elderly woman murdered in Lakhmapur; hands and feet tied before being thrown into water.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *