तरुणी ताब्यात, गुन्हा दाखल
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोड परिसरात रील बनवण्याच्या नादात हवेत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिस्तुलाच्या धाकावर लुटमारी करणारा संशयित भूषण गोसावी याच्या सांगण्यावरून त्याची 19 वर्षीय मैत्रीण कोमल रामदास गायकवाड हिने गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार करत त्याचा व्हिडिओ (रील) तयार केल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेतले असून, दोघांविरुद्ध शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरात अफरोज खान यांना पिस्तुलाचा धाक दाखवून 17 हजार रुपयांची लूट करणारा तसेच देवळाली गावात बांधकाम व्यावसायिक प्रशांत जाधव यांच्या मर्सिडीज कारवर गोळीबार व
दगडफेक करणारा संशयित भूषण गोसावी याचा पोलीस शोध घेत होते. तपासादरम्यान गुन्हे शोध पथकाला माहिती मिळाली की, गोसावीची मैत्रीण कोमल रामदास गायकवाड (वय 19, रा. संभाजीनगर, एकलहरा ट्रॅक्शन रोड, नाशिकरोड) हिने बेकायदेशीर गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार करून त्याचा व्हिडिओ मोबाइलमध्ये जतन करून ठेवला आहे.
या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने एकलहरा ट्रॅक्शन रोड परिसरात छापा टाकून कोमल गायकवाड हिला ताब्यात घेतले. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, महिला पोलिसांच्या उपस्थितीत तिचा मोबाइल तपासला असता गॅलरीतील व्हिडिओ फोल्डरमध्ये हवेत गोळीबार करतानाची चित्रफीत आढळून आली. चौकशीत कोमलने 14 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजता नाशिकरोड येथील वैभव हॉटेलमागील वडाच्या झाडाजवळ भूषण गोसावी याने तिला जिवंत काडतूस भरलेला गावठी कट्टा दिला आणि मौजमजेसाठी हवेत गोळीबार करण्यास सांगितल्याची कबुली दिली. गोळीबार करतानाचा व्हिडिओ भूषणने तिच्याच मोबाइलमध्ये चित्रित केला. त्यानंतर तो पिस्तूल घेऊन तेथून निघून गेला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार महेंद्र जाधव यांच्या फिर्यादीवरून कोमल गायकवाड आणि भूषण गोसावी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 20 हजार रुपये किमतीचा मोबाइल आणि संबंधित व्हिडिओ क्लिप असलेला पेनड्राइव्ह जप्त केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार विशाल पाटील करत आहेत. रीलच्या मोहापायी बेकायदेशीर शस्त्राचा वापर करून जीव धोक्यात घालणार्या या प्रकारामुळे तरुणांमध्ये वाढत चाललेल्या बेफिकीर प्रवृत्तीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
Young woman fires gun in the air for a reel.