पेठ-नाशिक महामार्गावरील घटना; एकजण गंभीर
दिंडोरी : वार्ताहर
नाशिक-पेठ महामार्गावरील हॉटेल ऋषीकेशसमोर पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार हरेष भीमा किरकिरे (वय 26, रा. पेठ) या युवकाचा मृत्यू झाला असून, त्याचा साथीदार पुष्पराज मधुकर झुंझुर्टे हा गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पेठ येथील युवक महामार्गावरील हॉटेलमध्ये जेवण आटोपून रात्री अकराच्या सुमारास दुचाकीने (एमएच 15 जेओ 2544) पेठेकडे परतत होते. त्यावेळी गुजरातकडून भाजीपाला खाली करून नाशिककडे जाणार्या भरधाव पिकअपने ( एमएच 14 एमटी 3546) दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की पिकअप रस्त्यावर पलटी झाली. स्थानिकांनी दोघांना तातडीने पेठ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नाशिक येथे हलवण्यात आले. दुर्दैवाने उपचारापूर्वीच हरेष किरकिरे याचा मृत्यू झाला, तर पुष्पराजवर उपचार सुरू आहेत.
मृत हरेषच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्याच्या पश्चात अवघ्या 8 महिन्यांचे बाळ आणि कुटुंब असून, घरातील कमावत्या व्यक्तीचा अंत झाल्याने उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या अपघाताबाबत पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.
Youth dies after being hit by pickup truck